नवी दिल्ली : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूएनजीएने (UNJA) रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त 5 मते पडली. त्याच वेळी, 35 देशांनी यात भाग घेतला नाही. रशियाने युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्यात अनेक शहरं बेचिराख झाली आहे. शहरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
तर दोन्ही देशांचे सैनिकही मोठ्या संख्येने मारले गेले आहे. युक्रेन आणि रशियाकडून घडीघडीला मोठी दावे तर रशियाकडून न्युक्लीअर हल्ल्याच्या धमक्या येत आहे. त्यामुळे युद्ध काही केल्या शांत व्हायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे जगभरातून रशियावर टीका होत आहे. अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंध लावले आहेत. कित्येक देशांनी त्यांच्या हवाई हद्दीत रशियाला बंदी घातली आहेत. तर रशियानेही अनेक देशावर रशियाच्या हवाई हद्दीत बंदी घातली आहे.
अमेरिकेकडूनही रशियाच्या कोंडीचा प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक प्रकारचे निर्बंद अमेरिकेने रशियावर लावले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. आजही रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे उद्याच्या चर्चेकडून जगाचे लक्ष लागले आहे. चर्चेतून मार्ग काढावा आणि रशियाने युद्ध थांबवावे असे आवाहन जगभरातील देशांकडून करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदींनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.