भाजप नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी हातावर ‘घड्याळ’ बांधण्याचं निश्चित केलं आहे. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. दोन एप्रिलच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया. आज शिवाजीरावांनी वाढदिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

शिवाजीराव नाईक हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, भाजपचे माजी आमदार आणि राज्यमंत्री आहेत. 2014 मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्हा परिषद आणि शिराळा पंचायत समिती भाजपची सत्ता आणा शिवाजीरावांना मंत्रिपद देतो, असे आश्वासन दिले होते. परंतु 2019 मध्ये शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला.

दरम्यान, मुंबईत झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित 2 एप्रिल 2022 रोजी शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन शिवाजीराव नाईक यांचा अधिकृत राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. मुंबईत झालेल्या भेटी वेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.