नुकताच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या पदापर्यंत मजल मारली आहे. अभ्यासाच्या बळावर आता जिल्ह्यातील अनेक तरुण जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेऊन ठेवत आहेत. अशाच एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थी रेंजर फॉरेस्ट ऑफिसर बनला आहे.
जिल्ह्यातील कडा या गावात राहणारा मंगेश पवळ हा नुकत्याच पार पडलेल्या (एमपीएससी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. त्याची (वनपरिक्षेत्र अधिकारी) अर्थात रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी नियुक्ती झाली आहे. कड्यासारख्या ग्रामीण भागातील युवकाने अभ्यासाच्या बळावर यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं कौतुक होत आहे.
मंगेश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी थेट पुणे गाठले आणि पुणे येथे बी इ, इलेक्ट्रिकल टेलि कम्युनिकेशनची पदवी घेत 2016 रोजी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना अनेकदा अपयश देखील आले. मात्र यावर्षी पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत त्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी या पदी नियुक्ती झाली आहे.
कडा येथील रहिवासी असणारा मंगेश यांचे वडील रमेश पवळ कटिंग सलूनच दुकान चालवतात. तर आई गृहिणी आहे. त्यामुळे घरची परिस्थिती आधीपासूनच जेमतेम होती. मागील वर्षीच मंगेश पवळ यांचा लहान भाऊ मयूर यांची एमपीएससी अंतर्गतच पीएसआय पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर मंगेश देखील वनपरिक्षेत्र अधिकारी झाले असून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.