कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय. अशातच राज्यात कोरोना रूग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसतेय. राज्यात कोरोनाचा वेरिएंट डेल्टा प्लसचे रूग्ण सापडत आहेत. तर नागपूरात डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
डेल्टा प्लसच्या रूग्णांची नोंद होत असल्याचं लक्षात आल्यावर नागपुरात होम आयसोलेशन बंद करण्यात आलंय. त्यामुळे यापुढे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावं लागणार आहे. किंवा त्या व्यतिरीक्त रूग्णाला रूग्णालयात दाखल व्हावं लागेल.
या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. सर्व झोन आयुक्तांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका कायम आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
तर कालच्या दिवसात संपूर्ण राज्यात 5 हजार 108 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 52 हजार 150 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.04 टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात 159 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 50,393 सक्रिय रुग्ण आहेत.