‘बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेलाच. आम्हीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो. तशा चुका तुम्ही करू नका’, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सत्तासंघर्षाच्या आठवणीला उजाळा दिला.
पुण्यातील बालेवाडीमध्ये राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत बुद्धीबळ स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोपरखळी लगावली.
‘बुद्धिबळासारख्या खेळात तुमच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात समोरच्या खेळाडूच्या कौशल्याचा नीट अभ्यास करणेही महत्त्वाचे असते. नेमकी हीच गोष्ट तुम्हाला स्पर्धेत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी पडेल, असे सांगून महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, ‘आम्ही असा अभ्यास केल्यामुळेच 2019 विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलो. हीच परंपरा यापुढेही कायम राहील’ असं म्हणत केदार यांनी फडणवीसांना टोला लगावला.
त्यानंतर फडणवीस यांनीही आपल्या भाषणात बोलत असताना पलटवार केला. ‘बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेलाच. आम्हीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो. तशा चुका तुम्ही करू नका’, असं फडणवीस म्हणाले.