पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव होणार असल्याने ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू असल्याचा टोला लगावला आहे. मोदींच्या टीकेला तृणमूल काँग्रेसने उत्तर दिलं असून वृत्त फेटाळलं आहे. यादरम्यान तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदींना रोडरोमिओ म्हटलं आहे.
“बंगालमध्ये आमच्याकडे एक शब्द आहे ज्याचा अर्थ रस्त्याच्या शेजारी भिंतीवर बसणारे आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आवाज देत दीदी-ए-दीदी म्हणणारे. पंतप्रधान हेच करत आहेत,” असं महुआ मोइत्रा यांनी म्हटलं आहे. लाखो लोक उपस्थित असणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना उपहासात्मकपणे दीदी ओ दी असं म्हणत होते. तुम्ही असं म्हणाल का ? ते आपल्या आईबद्दल असं बोलतील का ? हे ठीक कसं काय असू शकतं ? पंतप्रधान येऊन आता आम्हाला सभ्यतेबद्दल शिकवणार का ? पंतप्रधान येथे बसून हे सर्वात दर्जाहीन पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आहेत,” असं महुआ मोइत्रा यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केला. ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, “दीदी तुमच्या वागण्यावरुन नंदीग्राममध्ये पराभव होणार असं दिसत आहे. तुम्ही पराभव मानल्याचं दिसत आहे. दीदी ओ दीदी…तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळालं आहे. यामध्ये काही सत्य आहे का ?”.