भुसावळ खाद्य भ्रमंती : 4.
भुसावळचा उन्हाळा म्हणजे काय वर्णावा महाराजा.. सकाळी जे अफाट गरम व्हायला सुरुवात होते ते रात्री 12 – 1 पर्यंत त्याची क्वालीटी तीच. घराच्या भिंती सुध्दा गरम लागतात हाताला. मग काही ताक किंवा मठ्ठा प्यायला निघतात तर काही ऊसाचा रस, काही जण बर्फाच्या गोळ्यासाठी तर काही चक्क गरमागरम चहासाठी.. एखाद्या पाहुण्याने जर विचारले कि चहा कसा काय बुवा.. तर भुसावळकर त्याला शोले मधला संवाद ऐकवतात ” लोहा लोहे को काटता है न बे “! पाहुणा भर उन्हात गारेगार.. बर्फाच्या गोऴ्यासाठी मरीमातेच्या मंदिराजवळचा गोळेवाला फेमस, त्यावेळेस बर्फ किसायला मशिन वगैरे नव्हते तर त्यासाठी पटाशीचा वापर केला जायचा, पटाशीला उलटी करुन, एका लाकडी स्टँडवर तिला बसवली जायची त्यावर बर्फाचा चौकोनी तुकडा, तो किसतांना हाताला गार लागु नयेे म्हणुन गोणपाटाचा तुकडा, असा तो बर्फ किसला जायचा मग त्यात बांबूची तासलेली काडी, टोकाला जरा दुमडून त्याभोवती तो गोळा घट्ट बांधायचा आणि गि-हाईकाच्या मागणीप्रमाणे, कालाखट्टा, गुलाब,आँरेंज इ.फ्लेवरमध्ये बुडवुन तो पेश केला जायचा.. ऊसाचा रस म्हटल कि पावल हटकुन कल्पना रसवंतीकडे वळायची.. भरपुर बर्फाचे खडे ग्लासात भरुन वर चरकातुन काढलेला ताजा रसरसशीत ऊसाचा रस हा ग्लासात वरुन ओतला जायचा त्यामुळे त्यावर एक हिरव्यागार फेसाची लेअर यायची तो फेस चुकवत रस पिणे म्हणजे सुखाची परमावधी.. जवळच गोकुळ सोडा होता तिथे मसाला सोडा तर मिळायचाच पण येणा-या जाणा-या सर्वांना थंडगार पाणीदेखील मिऴायचे कारण आताच्यासारखी लोक सोबत बिसलरीच्या बाटल्या घेवुन बाहेर पडत नव्हती, हायजीन वगैरे ह्या गोष्टी, त्यावेळेस आमच्यापासुन कोसो दुर होत्या, त्याच्याजवळच बोंडे यांचे हाँटेल होते साधे पत्र्याचे हाँटेल पण तिथल्या शाकाहारी व मांसाहारी जेवणाची चव जिभेवर रेंगाळणारी.. तिथली शेवभाजी तुमच्या पंचेंद्रियांना धक्का देवुन जायची व हे सर्व पदार्थ चिनीमातीच्या बशीतुन सर्व्ह केले जायचे, आता त्याच तीनमजली हाँटेल मध्ये रुपांतर झालय, पण चव मात्र तीच..जोडीला त्यांनी बोंडे मसाले हा ब्रँड तयार करुन त्याचही आउटलेट सुरु केलय, त्यांचा मसाला आता देशाची सीमा ओलांडुन परदेशात पोहोचलाय.. शेव भाजीवरुन आठवल तिथेच असलेली प्यारेलालची भाजीची शेव हि तिच्या कडकपणामुळे फेमस होतीच पण लोक जीव टाकायची ती त्या शेवेच्या पुडीमध्ये येणा-या दोन भज्यांसाठी, घरी आल्यावर ती पुडी सोडुन ती भजी आधी तोंडात टाकायची, मग शेवभाजी भलेही न मिळो इतकी की भजी छान असायची..
भुसावळ आणि सिनेमा यांच एक अफाट नात आहे,कारण मंनोरंजनाची साधने कमीच किंबहुना नव्हतीच, टि.व्हि. हा प्रत्येकाकडे नव्हता. मँच, सिनेमे, बुधवारचा चित्रहार,शुक्रवारचे छायागीत, शनिवार ,रविवारचे सिनेमे हे दुस-यांकडे बघायला जाव लागायच ते देखील ज्यांच्याकडे टि.व्ही होता त्यांच्या मर्जीवर ते अवलंबुन असायच..त्यामुळे सिनेमांच आकर्षण फार , भुसावळ हे रेल्वेचे जं. असल्यामुळे मुंबईशी कनेक्टिवीटी इतरांच्या मानाने अधिक,त्यामुळे बहुतेक सिनेमांचे प्रिमिअर तिथे व्हायचे. राजश्री प्राँडक्शन, राजकमल पिक्चर्स अशी नामवंत लोकांची वितरण कार्यालय देखील तिथे होती, तो संबंध काळच हा थिएटरांचा सुगीचा काळ होता..पांडुरंग, वसंत, अमरदिप, मामाजी, अकबर हि थिएटर्स व त्यांच्या सभोवतालच खाण अतिशय लोकप्रिय. त्यांना थिएटर अस न म्हणता “टाकी ” अस म्हणत ( मुळ उच्चार टाँकिज) कुढी चाल्ला बे ? समोरुन उत्तर यायच पांडुरंग टाकीले..अभिताभचा नवा पिच्चर आला न बे..चालतो का ? प्रश्नकर्ता गुमान त्याच्याबरोबर चालायला लागायचा..त्या पांडुरंग टाँकिजच्या खाली मद्रास रेस्टाँरंट नावाचे एक साउथ इंडीयन हाँटेल होतेे. तिथला डोसा मोठा झकास होता, कुरकुरीत डोसा, त्यात बटाट्याची भाजी भरलेली सोबत सांबार ( हाँटेल हे भुसावळचे असल्याने सांबारदेखील तिखट ) तो अण्णा त्याबरोबर लोणचहि द्यायचा, जरा आगळवेगळच काँम्बिनेशन होत पण कमाल होत. टाँकिजच्या समोरच,भुसावळची प्रसिध्द “जनता जनार्दनची भेळ ” , उकडलेले हरबरे त्यात तिखट शेव ,कांदा वर लिंबु पिळलेल..हि भेळ कागदात यायची शक्यतो पार्सल नेण्यावर भर असायचा कारण उभ राहण्या इतपत तिथ जागा नव्हती. तसच पुढ गेल कि रेल्वेचा ब्रिज आहे, इतर ठिकाणी रेल्वे खालुन जाते मात्र भुसावळात ती वरुन जाते.. गावाचा महिमा दुसर काय.. पुल ओलांडल्यावर ब्रिजवासी हाँटेल आहे, त्यांच्याकडची कचोरी व समोसे आणि सोबत बडिशेप घातलेली चिंचेची चटणी अप्रतिम. ब्रिजवासीच्या समोरच ममता रेस्टाँरंट, तिथला बाज अस्सल ग्रामीण..भरीत आणि कऴण्याची भाकरी , वर हिरव्या मिरचीचा ठेचा, इतरही पदार्थ तिथे मिळतात पण हे रेस्टाँरंट जास्त प्रसिध्द ह्या दोन गोष्टिंसाठी..इथल भरीत म्हणजे बैंगन का भर्ता वगैरे प्रकारातल नाही, तर भरपुर तेलात हिरव्या मिरच्या, लसुण व ओवा व शेंगदाणे घातलेल..व भाकरी देखील भलीमोठी एखादा नवशिक्या अर्ध्या भाकरीतच गार होईल, तस भरीतासाठी प्रसिध्द असलेल अजुन एक ठिकाण म्हणजे हाँटेल अनिल, तिथे भरीत भाकरी तर असायचीच पण भाकरीला पर्याय म्हणुन कळण्याच्या पु-या असायच्या.. तसच चालत पुढ गेल कि वसंत टाँकिज.. आता तिथल्या खाण्याचा माहोल पुढच्या भागात.. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.
© सारंग जाधव