राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असं देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं, असा आरोप सिंग यांनी केला आहे. या लेटरबॉम्बनंतर भाजपा देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे.
“दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या. मुंबईतली १७५० मद्यालये, पब, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला दोन ते तीन लाखांचा हप्ता घेतल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या,” असा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला. या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पत्रानंतर भाजपाकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राज्यात अचानक निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.