मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेण्याचा इशारा दिल्यानंतर आता MIM पक्षही आक्रमक झालाय. राज ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा घेण्याची रणनीती पक्षानं आखल्याचं समजतंय.
ओवेसींची पहिली सभा ही औरंगाबादमध्येच होऊ शकते. पक्षाचा महाराष्ट्रातला पहिला खासदार याच शहरातला असल्यानं धडाकेबाज सुरूवात करण्याचा MIMचा इरादा आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानापेक्षा दुप्पट मोठ्या आम-खास मैदानात ही सभा होऊ शकते. त्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, परळी इथंही ओवेसी सभा घेऊ शकतात.
1999 साली एमआयएमनं राज्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर थेट 2009 साली MIMनं नांदेड उत्तर आणि लातूर शहर या जागी उमेदवार उभे केले. या दोन्ही ठिकाणी पक्षाला यश आलं नाही.
2012 साली नांदेड महापालिकेत पक्षाचे तब्बल 11 नगरसेवक निवडून आले. 2014मध्ये प्रथमच ओवेसींच्या पक्षाचे 2 आमदार विधानसभेत पोहोचले. 2015मध्ये औरंगाबाद महापालिकेत MIMचे 25 सदस्य निवडले गेले. तर 2019मध्ये औरंगाबादमधूनच इम्तियाज जलील लोकसभेत पोहोचले. तर धुळे आणि मालेगावमधून पक्षाचे 2 आमदार निवडून आलेत.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर केवळ भाजप आणि शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही आरत्या करताना दिसतायत. हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊ नये, यासाठी हे पक्ष प्रयत्न करत असताना आता MIMच्या सभांमुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाता आहे.