31 ऑगस्टला मध्यरात्री चाळीसगाव घाटातून औरंगाबादकडे येणाऱ्या स्कोडा गाडीसमोर असलेल्या ट्रकवर दरड कोसळल्याने तो ट्रक दरीत कोसळला. ढगफुटीसदृश्य पावसात, आकाशात प्रचंड वीजांचा कडकडाट होत असताना डोळ्यादेखत ट्रक वाहून गेल्याचे पाहून स्कोडा गाडीमध्ये प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले. या गाडीत औरंगाबादचे शिवसेना कार्यकर्ते मयूर कंटे, योगेश डहाळे, विनय लाहोट आणि सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख हे उपस्थित होते. चाळीसगाव घाटातले फोटो सकाळी माध्यमांसमोर आले, मात्र त्या रात्री नेमके काय झाले, अशोक चव्हाणांकडून तिथपर्यंत कशी मदत पोहोचली हा घटनाक्रम मोठा लक्षवेधी आहे.
डोळ्यादेखत ट्रक वाहून गेल्याचे पाहून स्कोडा गाडीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख मयूर राजेंद्र कंटे यांनी अनेकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी 100 नंबरला फोन केला तेव्हा तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागात फोन करा असा सल्ला मिळाला. त्यावेळी या विभागात कोणाला फोन करायचा हे कळले नाही. पण मोबाईलमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा नंबर दिसला. रात्री एक वाजता त्यांना फोन लावला.
मयूर कंटेंनी फोन लावला असता, अशोक चव्हाण यांनी एवढ्या रात्री स्वतः फोन उचलला. ‘मी अशोक चव्हाण बोलतोय, बोला काय आहे’, असे विचारल्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला. ‘मुसळधार पावसात आम्ही अडकलो असून जगू की मरू याचीही शाश्वती नाही. तिथे अजूनही अनेक लोक अडकले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे’, असे सांगितले. त्यानंतर अशोक चव्हाणांनी शिवसैनिकांना धीर दिला. ते म्हणाले, ‘घाबरू नका, मी मदत करतो’. त्यानंतर त्यांनी सगळी यंत्रणा हलवली.
मयूर कंटे आणि इतर मित्रांनी अशोक चव्हाणांना फोन केला आणि ते घटनास्थळी गाडी तिथेच ठेवून पुढे चालू लागले. मुसळधार पावसात त्यांनी अवघा घाट पूर्ण चढला. जवळपास 10 किमी पायी चालण्याचा हा अनुभव प्रचंड भीती, अस्वस्थता, काळजीनं भरलेला होता, असे कंटे यांनी सांगितले. चव्हाणांच्या मदतीमुळे काही वेळातच कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार आदींचे फोन यायला सुरुवात झाले. त्या ठिकाणचे स्थानिक आमदार मंगेश चव्हाणही मदतीसाठी धावून आले आणि अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवता आले.
चाळीसगाव घाटाच्या खाली प्रचंड पूर आल्याने डोळ्यादेखत गुरेढोरे आणि उभे पीक वाहून गेले. म्हशी घेऊन जाणारा ट्रक चालक वाहून गेला. ढगफुटीचे हे दृश्य पाहून साक्षात मृत्यू काय असतो, याची जाणीव झाल्याची भावना मोहसीन शेख यांनी व्यक्त केली.
अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा थरार अजूनही डोळ्यासमोरून हटत नाही, असे सांगताना कंटे म्हणाले की, निसर्ग कोपलेला पाहिला. पण एका गोष्टीचा अभिमान वाटला. महाराष्ट्र राज्यात असेही अनेक मंत्री आहेत, जे रात्री-बेरात्री सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येतात. एक शिवसैनिक म्हणून अशोक चव्हाण व प्रशासनाचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कंटे यांनी व्यक्त केली.