आज दि.६ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राजधानी दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के

गेल्या काही दिवसांत भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. शुक्रवारी (३ नोव्हेंबर)मध्यरात्री नेपाळमध्ये ६.४ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. या भूकंपाने दिल्लीसह आसपासच्या परिसरात धक्के जाणवले. भूकंपाची ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासचा परिसर हादरला आहे.

इस्रायल-हमास संघर्ष अण्वस्रयुद्धाच्या दिशेने? अमेरिकेची मोठी घोषणा, मध्य-पूर्वेत भीतीचं वातावरण!

गेल्या महिन्याभरापासून चालू असलेलं इस्रायल-हमास युद्ध अद्याप थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. जगभरातल्या देशांसह संयुक्त राष्ट्रांनीही दोन्ही बाजूची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने युद्धबंदी करण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूंनी ही मागणी धुडकावून लावली असून युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं दिसत आहे. इस्रायलचं सैन्य पुढच्या ४८ तासांत गाझा शहरात शिरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली असून त्यामुळे युद्धाची सर्व समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

“मराठा आरक्षणाला विरोध नाही पण…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ओबीसीमध्ये अतिशय लहान लहान जाती आहेत. धनगर, वंजारी, कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, कुंभार असे अनेक लोक त्यात आहे. त्यामुळे ओबीसींमधून आरक्षण दिलं तर कुणाचाच फायदा होणार नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“इतक्या नोंदी सापडत आहेत की…”, न्या. शिंदे समितीच्या बैठकीनंतर जरांगेंच्या शिष्टमंडळाची प्रतिक्रिया

मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळण्याकरता सरकार पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सरकारने हाती घेतले असून या कार्याला पुढील दिशा देण्याकरता आज न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उपस्थित होते. यामध्ये अभ्यासक रविंद्र बनसोडे, पांडुरंग तारक, अंतरवाली सराटी गावचे सरपंच डॉ. रमेश तारक आणि इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कुणबीच्या नोंदी शोधण्याकरता इतर पर्यायांचा वापर करण्यात येणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

“…तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २,३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी रविवारी (५ ऑक्टोबर) मतदान पार पडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. आशाताई पवार म्हणाल्या, माझं वय आता ८६ वर्षे इतकं आहे, त्यामुळे माझ्या हयातीत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं.संजय राऊत म्हणाले, अजित पवार आज जे काही आहेत, ते त्यांना शरद पवारांनीच बनवलं आहे. शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. आता मुख्यमंत्री होण्यासाठी ते अमित शाहांकडे गेले असतील तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील.

दिवाळीपूर्वीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. बँकेने विविध मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात बदल केले आहेत, जे १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत.

पंजाब नॅशनल बँक १० वर्षांपर्यंत FD सुविधा देते, ज्यांचे व्याजदर ३.५ टक्क्यांपासून ७.२५ टक्क्यांपर्यंत सुरू होते. 

बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या ‘टायगर ३’ला टक्कर देणार दोन बहुचर्चित मराठी चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी चित्रपट आणि दोन मराठी चित्रपट आमने सामने बऱ्याचदा आले आहेत.यंदाची दिवाळी मात्र खास असणार आहे, कारण दिवाळीच्या महूर्तावर जरी सलमानचा ‘टायगर ३’ प्रदर्शित होत असला तरी त्याला टक्कर देण्यासाठी २ मराठी चित्रपटही यंदा त्याचदरम्यान प्रदर्शित होत आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व सुजय डहाके यांचा ‘श्यामची आई’ हे दोन्ही मराठी चित्रपट येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.