आज दि.७ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकरांची नियुक्ती

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेता आदेश बांदेकर यांच्याकडे या पदाची सूत्रे गेल्या अनेक वर्षांपासून होती. परंतु, आता तडकाफडकी मंदिर न्यायासचे अध्यक्षपद सदा सरवणकरांकडे गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकण व मध्य महाराष्ट्रावर परिणाम

मोसमी पावसाने काढता पाय घेतला असला तरीही अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर उर्वरित राज्यात काही दिवसपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वरार्धात थंडी कमी जाणवणार आहे.

दिल्लीच नाही देशातल्या सर्व राज्यांमध्ये ‘या’ फटाक्यांवर बंदी! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने बेरियम आणि प्रतिबंधित रसायनांपासून तयार करण्यात आलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. तसंच हेदेखील स्पष्ट केलं आहे की याविषयीचे निर्देश फक्त दिल्लीच नाही तर प्रत्येक राज्यासाठी लागू आहेत. एका याचिकेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश लागू केले आहेत. बेरियमचा वापर होत असलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतं त्यामुळे या फटाक्यांवर आणि प्रतिबंधिक रसायनांचा ज्या फटाक्यांमध्ये वापर होतो त्या फटाक्यांविषयी हे निर्देश देण्यात आले आहे. तसंच हे निर्देश दिल्लीसाठी नाही तर सगळ्या राज्यांना बंधनकारक आहेत असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

कमी मताधिक्याने काँग्रेसचा विजय झालेल्या मतदारसंघात बसपाच्या मायावतींची सभा

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने ओबीसी समाजाची मते मिळविण्यासाठी जातनिहाय जनगणनेचे फसवे आश्वासन दिले असल्याची टीका मायावती यांनी सोमवारी काँग्रेसवर केली. मध्य प्रदेशमधील २३० विधानसभेच्या मतदारसंघासाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यापैकी १८३ मतदारसंघांमध्ये मायावती यांचा बसपा पक्ष गोंडवाना गणतंत्र पक्षासह (GGP) निवडणूक लढविणार आहे, तर उर्वरीत ४७ जागांवर जीजीपी पक्ष निवडणूक लढविणार आहे.

मतदान केंद्रांवर नक्षली हल्ले, तीन जिल्ह्यांमध्ये चकमकी, CRPF चे जवान जखमी

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रांवर हल्ले केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी आणि सीमा सुरक्षा बल तसेच डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एके ४७ रायफल जप्त केल्या आहेत. या चकमकीनंतर बांद्यासह आसपासच्या भागात सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाले असावेत असा अंदाज वर्तवला आहे. कांकेरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एक महिन्याच्या युद्धानंतर नेतान्याहू यांचा मोठा निर्णय, गाझातील नागरिकांना दिलासा मिळेल?

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यास आज बरोबर एक महिना पूर्ण झाला. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रे डागून हल्ला चढवला होता. त्यानंतर, इस्रायलनेही युद्धाची घोषणा करून हमासला प्रत्युत्तर दिलं. तसंच, सातत्याने गाझा पट्टीवरीही हवाई हल्ले केले. परिणामी गाझा पट्टीर मानवतावादी सुविधांची कमतरता निर्माण झाली असून सुरक्षाही धोक्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दोन संकेत चर्चेचा विषय राहिले आहेत.वैद्यकीय आणि इतर स्वरूपाची मदत सामग्री गाझात पोहोचू लागली असली, तरी युद्धविराम घोषित न झाल्यामुळे ही मदत त्रोटक ठरू लागली आहे. त्यामुळे युद्धविराम घेऊन गाझातील नागरिकांना मदत पुरवण्याचं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलं होतं. परंतु, युद्धविरामाची सूचना इस्रायलने नाकारली असून ओलिसांना सोडत नाही तोवर युद्धविराम अशक्य असल्याची भूमिका घेतली आहे. परंतु, गाझातील नागरिकांना मदत पुरवण्यासाठी काही काळ युद्धविश्रांती घेतली जाऊ शकेल, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. त्यामुळे, नेतान्याहू यांनी खरेच युद्धादरम्यान ब्रेक घेतल्यास गाझातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

दक्षिण कोरियात ढेकणांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

जगभरातील अनेक देश, राज्यं आणि शहरं वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत असतात. नागरिकांना कधी नैसर्गिक आपत्यांचा सामना करावा लागतो, तर कधी मानवनिर्मित संकटांशी दोन हात करावे लागतात. संकटाच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांना सर्वात पुढे उभं राहून सेनापतीप्रमाणे लढावं लागतं. असंच एक संकट दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलवर आलं आहे. सेऊलमध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या उद्रेकामुळे इथल्या सेऊलमधल्या अधिकाऱ्यांना चक्क ढेकणांशी दोन हात करावे लागत आहेत.

एअरबसचा महिंद्रा एरोस्पेससह चार कंपन्यांशी करार

युरोपमधील विमान निर्मिती कंपनी एअरबसने भारतातील चार कंपन्यांशी विमानांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी करार केले आहेत. त्यात महिंद्रा एरोस्पेससह एकस, डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज आणि गार्डनर एरोस्पेस या कंपन्यांच्या समावेश आहे.भारतातील चार कंपन्यांशी ‘मेक इन इंडिया’ उद्दिष्टाला साजेसा करार करण्यात आल्याची घोषणा एअरबसने सोमवारी केली. एअरबसच्या ए३२० निओ, ए ३३० निओ आणि ए ३५० या प्रकारच्या विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन या कंपन्या करणार आहेत. या कंपन्यांकडून एअरबसला विमानाच्या बाह्य भाग आणि पंख्याचे भाग यांचा पुरवठा होणार आहे. एअरबसने या आधीच वर्षाच्या सुरुवातीला, ए ३२० निओ प्रकारच्या विमानांच्या दरवाजाच्या उत्पादनासाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स कंपनीशी करार केला आहे.

एकेकाळी ४७ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन होते, आता जगातील सर्वात मोठी कंपनी दिवाळखोरीत

एकेकाळी वॉल स्ट्रीटच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली ग्लोबल को वर्किंग (Co-Working) कंपनी WeWork ने अमेरिकेत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला आहे. WeWork ही जगातील आघाडीच्या सहकारी कंपन्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे एकदा या कंपनीचे बाजारमूल्य ५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार होते.WeWork ने दिवाळखोरी संरक्षणाचा अर्ज ११ अंतर्गत तयार केला आहे. याबरोबरच कंपनीने कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांच्या खात्यांची सर्वसमावेशक पुनर्रचना प्रक्रिया सुरू केली आहे. न्यू यॉर्क एक्सचेंजवर सूचीबद्ध WeWork ने म्हटले आहे की, यूएस आणि कॅनडाबाहेरील तिची केंद्रे या प्रक्रियेचा भाग असणार नाहीत. SoftBank समर्थित WeWork Inc. चे बाजारमूल्य एकदा ४७ अब्ज डॉलरपर्यंत गेले होते. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीला ६९६ दशलक्ष डॉलरचा निव्वळ तोटा झाला आहे.

विराट कोहलीने केले फिंगर क्रॉस, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सचिनची इच्छा होईल पूर्ण?

विराट कोहली म्हणाला की, “२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे.” कोहलीने रविवारी ३५व्या वाढदिवसानिमित्त विश्वचषकातील सामन्यात १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे शतक होते, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिनची बरोबरी केली आहे. या विक्रमानंतर सचिनने विराट कोहलीचे ट्वीट करून अभिनंदन केले होते आणि कोहली लवकरच आपले ५०वे शतक झळकावेल आणि त्याचा विक्रम मोडेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.