आज दि.८ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत हवामानातील असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात होती. आता दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.राज्यातील विविध जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त क्षेत्राचं केलेल्या सर्वेक्षणाचे अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आजपासून विम्याची रक्कम वितरीत करायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.

सोलापुरात पावसाच्या सरी; तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दिवाळी बाजारपेठांवरही पावसाचे सावट

सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांशी भागात बुधवारी पहाटे मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारीसह इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र द्राक्ष बागांसाठी हा पाऊस आणि ढगाळ हवामान हानीकारक असल्याचे मानले जाते.

वस्रोद्योग अडचणीत असताना कामगारांना १२ टक्के बोनस

विटा शहरातील यंत्रमागकामगारांना चालु वर्षी १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.विटा शहर, औद्योगिक वसाहत व परीसरातील यंत्रमागकामगार, वहिफणीवाले ,जॅाबर्स, घडीवाले ,कांडीवाले अशा २००० कामगारांना सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे वितरण या माध्यमातुन होत आहे.गेल्या काही वर्षापासुन जागतीकरण, केंद्र व राज्य शासनाची उदासीन धोरणे व कोरोना महामारीने वस्त्रोद्योग कमालीचा अडचणीत सापडला आहे.चार वर्षापासुन कापसाच्या व सुताच्या दरातील अस्थिरता व साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वीजेचे वाढलेले दर, परदेशातून करचुकवेगीरी करुन आयात होणारे कापड, नोटबंदी,जीएसटी, प्रादेशीक व सहकारी-खाजगी उद्योगांतील शासकिय भेदभाव यासारख्या कारणाने व राज्य व केंद्र शासनाची चुकीची धोरणे व दुर्लक्षामुळे सात्तत्याने अडचणीतुन सुरु आहे.

पूर्व क्षितिजावर चंद्र-शुक्र युतीची उद्या अपूर्व अनुभूती; खगोलप्रेमींसाठी आकाश दिवाळीची पर्वणी

खगोलप्रेमींना आकाश दिवाळीची पर्वणी मिळणार आहे. पूर्व क्षितिजावर चंद्र-शूक्र युतीची अपूर्व अनुभूती गुरुवारी घेता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. दिवाळीच्या उत्सवात आकाशही सहभागी होणार असल्याने खगोलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि आपल्या पृथ्वीला सर्वात जवळ असलेला शूक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असून ९ नोव्हेंबर रोजी या ग्रहाची चंद्रासोबत युती घडुन येत आहे.चंद्र ३.३० च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदय पावून सकाळी ९.१५ च्या सुमारास आकाश मध्याशी येतील. याच दिवशी दिवसा सुद्धा शूक्र दर्शन होऊ शकते. चंद्र व शूक्र ग्रह कन्या राशीत असून चंद्राची अकरावी तर शूक्र ग्रहाची नवमीची कला असेल. चंद्रकोर आणि शूक्र हे दोन्ही खगोल एकमेकांच्या अगदी जवळ असतांनाचे दृश्य सर्व आकाश प्रेमींनी पहाटे ४ ते ६ या वेळात अवश्य आपल्या डोळ्यात साठवावे, ते अप्रतिम स्वरूपात असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

राज्यासह देशातील वातावरणात मोठे बदल; ऐन हिवाळ्यात थंडीसह ऊन आणि पाऊसही

राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असून काही भागात दिवसा ऊन तर पहाटे आणि रात्री थंडी पडत आहे. एवढेच नाही तर ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने नोंदवली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशपातळीवरही हे बदल होत आहे. तामीळनाडूत अतिवृष्टी तर कर्नाटक आणि गोव्यावरही पावसाचे सावट असल्यामुळे हिवाळ्यात थंडीची नाही तर पावसाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आणि काही ठिकाणी वातावरण कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

“२४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

माझी प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मी पुढच्या दोन तीन दिवसात माझं काम पुन्हा सुरु करतो आहे. मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरु आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्रं पडू लागली आहेत. जेव्हा नाराजी व्यक्त करायची होती तेव्हा आम्ही ती व्यक्त केली पण आज पूर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या; ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी CBI तपास करणार

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोवर मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणीदेखील त्यांनी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मोईत्रा यांची नीतिमत्ता समितीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग या प्रकरणाचा तपास करणार आहे.

शुबमन गिलचा बाबर आझमला दे धक्का! आयसीसी क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमची राजवट संपवत भारतीय स्टार शुबमन गिल आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मोहिमेची जोरदार सुरुवात करताना शुबमन गिलने बाबरला मागे टाकले आणि या यादीत तो सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर प्रथम क्रमांक मिळवणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी द्विशतकी खेळीवर विराट कोहलीचे सूचक विधान

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला क्रिकेट विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीत पोहचवले आहे. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या ९१ धावांत ७ विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियन्सनेही आपला पराभव मान्य केला असावा पण मैदानावर उपस्थित ग्लेन मॅक्सवेलला विश्वास होता की तो येथूनही आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो आणि त्याने ते करून दाखवले. मॅक्सवेलने विक्रमी द्विशतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. आरसीबीमध्ये त्याच्याबरोबर खेळणाऱ्या विराट कोहलीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत मॅक्सवेलचे कौतुक केले आहे.

मोदी सरकारकडून सर्व राज्यांकरिता नोव्हेंबर २०२३ साठी ७२,९६१.२१ कोटी रुपयांचं वाटप

आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर २०२३ महिन्यासाठी ७२,९६१.२१ कोटी रुपये कर हस्तांतरण १० नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या ऐवजी ७ नोव्हेंबरला करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल.जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वाटपही करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राला ४६०८.९६ कोटी रुपये देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्याला २९५२.७४ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, २० हजार कोटी रुपये जमवणार

मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील सर्वात मोठी बाँड विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाँड विक्रीद्वारे कंपनी बाजारातून अंदाजे २० हजार कोटी रुपये जमा करेल. BFSI नसलेल्या खासगी कंपनीकडून येणारी ही सर्वात मोठी ऑफर आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच रिलायन्सकडून असे पाऊल उचलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.