वेरुळ लेणीसमोरील जैन कीर्तिस्तंभ हटवण्याचा निर्णय

जगप्रसिद्ध वेरुळ लेणीसमोरील जैन कीर्तिस्तंभ हटवण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे जैन समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुरातत्त्व खात्याने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. वेरुळ लेण्या हिंदू, जैन आणि बौद्ध अशा तीन धर्मांचे प्रतिनिधीत्व करतात. परंतु हा स्तंभ एकाच धर्माचे प्रतिनिधित्व करतो. तसेच येथे असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे जागेचाही अडथळा येतो, असे पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मात्र स्तंभ हटवण्यावरून जैन समाजात तीव्र असंतोष आहे. बुधवारी वेरुळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलसह जैन समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांची भेट घेतली. हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने हा कीर्तिस्तंभ सध्या तरी जैसे थे ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

वेरुळ लेणी परिसरातील या स्तंभामुळे फेरीवाल्यांना अडथळा निर्माण होतो. या स्तंभामुळे अनेक अपघात झाले आहेत. तसेच वेरुळ येथील लेण्या हिंदू, जैन आणि बौद्ध या तीन धर्मांचे प्रतिनिधित्व करत असताना हा स्तंभ केवळ जैन या एकाच धर्माचे प्रतिनिधित्व करतो, यामुळे हा स्तंभ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे करताना कुणालाही अंधारत ठेवण्यात आले नव्हते, अशी प्रतिक्रिया पुरातत्त्व खात्याचे अक्षीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली. वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री तसेच अलीकडेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही ही माहिती दिली होती, असेही ते म्हणाले.

भगवान महावीरांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त 1974 मध्ये देसभरात जैन कीर्तिस्तंभ उभारण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता. तत्कालीन आयुक्त बी. के. चौगुले यांनी वेरुळ, कन्नड आणि बाबा पेट्रोल पंप येथे स्तंभाला मंजुरी दिली होती. सकल जैन समाजाच्या सहकार्याने तो उभारण्यात आला. दरवर्षी महावीर जयंतीनिमित्त येथे ध्वजारोहण, मिरवणूक आणि सद्भावना कार्यक्रम होतात. 48 वर्षानंतर हा स्तंभ काढणे चुकीचे आहे. हे कुणाच्या जागेवर अतिक्रमण नसल्याने तो आहे त्याच जागेवर ठेवावा आणि त्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी भूमिका पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांड यांनी मांडली.

दरम्यान, जैन समाजातील संघटनांच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुरातत्त्व अधिकाऱ्यांची भेट घेतली. औरंगाबादमधील तीन स्तंभांपैकी वेरुळचा स्तंभ सर्वात आधी उभा राहिला. पर्यटक येथे फोटो काढतात. मात्र काही लोक येथे विनाकारण गर्दी करतात. दारू पिऊन गोंधळ घालतात. आता हा रस्ताच बंद होणार असल्याने वाहनांची वर्दळ कमी होईल. स्तंभाची अडचण होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून हा स्तंभ हलवू देणार नाही, अशी भूमिका चंद्रकांत खैरे यांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.