पुरुष मल्लांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीबरोबर आता महिला मल्लांच्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवणार, असल्याचे दिपाली सय्यद सोलापुरात म्हणाल्या आहेत. लवकरच पनवेलमध्ये पहिली महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा भरवणार, अशी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जाहीर घोषणा केलीय. डीबीएस रेस्टलिंग फाउंडेशनतर्फे ही कुस्ती स्पर्धा भरवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पुरुषांसाठी स्पर्धा आहेत मात्र महिलांसाठी नाहीत त्यामुळे त्यांनाही समान संधी मिळण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महिलांसाठी मॅट आणि माती या दोन्ही प्रकारच्या कुस्तीसाठी प्रोत्साहन देणार, असेल्यााचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राला आणि देशाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आपल्या देशातले अनेक मल्ल जागतिक स्तरावर गाजले आहेत. कुस्तीने भारताला ऑलिम्पिकमध्येही अनेक पदकं जिंकून दिली आहे. सुरूवातील या खेळात पुरुषांचा बोलबाला होता. मात्र आता या खेळात महिलाही मागे राहिल्या नाहीत. महाराष्ट्रातही अनेक मुली सध्या कुस्तीकडे वळत आहेत. अनेक महिला मल्ल अनेक स्पर्धा खेळत आहेत, जिंकत आहेत.
आपल्या महाराष्ट्रात 1969 पासून महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. मात्र यात सध्या फक्त पुरूषांचा सहभाग आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि कुस्तीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सोलापुरात मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महिला मल्लांसाठी क्रांतिकारी ठरू शकते. कारण यानंतर महिलांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.
आपल्या देशाला कुस्तीत महिला मल्लांनीही अनेक पदकं मिळवून दिली आहेत. हरियाणातील गीता फोगाट आणि इतर फोगाट बहिणींवर तर दंगलसारखे सिनेमे बनले आहेत. त्यामुळे पूर्वीचा दृष्टीकोण बदलत असून या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्याता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अनेक मुली सध्या या क्षेत्राकडे करिअर आणि छंद या दोन्ही दृष्टीकोणातून पाहत आहेत. त्यामुळे या स्पर्धा महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकतात. या स्पर्धेचे नियोजन, सातत्य आणि सहभाग या स्पर्धेला आणखी मोठ्या पटलावर घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे नक्कीच कुस्ती क्षेत्रासाठी हे एक मोठं पाऊल ठरेल.