बांगलादेशने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेवेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 155 धावांचं माफक आव्हान बांगलादेशने अवघ्या 1 विकेट्सच्या मोबदल्यात 37 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यासह बांगलादेशने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकत मोठा पराक्रम केला. बांगलादेशची आफ्रिकेत मालिका विजय मिळवण्याची ही पहिली वेळ ठरली.
बांगलादेशकडून कर्णधार तमिम इक्बालने सर्वाधिक नाबाद 87 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 14 चौकार लगावले. लिटोन दासने 48 धावा केल्या. तर शाकिब अल हसनने नाबाद 18 धावा केल्या. आफ्रिकेकडून केशव महाराजने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी आफ्रिकेने टॉस जिंकून बँटिंगचा निर्णय घेतला. मात्र तास्किन अहमदच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेची दाणादाण उडाली. तास्किनच्या माऱ्यासमोर आफ्रिकेने शरणागती पत्कारली.
तास्किनने ठराविक अंतराने आफ्रिकेला झटके दिले. तर सहकारी गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशच्या या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा 154 धावांवर बाजार उठला. तास्किनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शाकिबने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर शोरिफुल इस्लाम आणि मेहदी हसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या 3 सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना बांगलादेशने जिंकून आघाडी घेतली. तर दुसरा सामना आफ्रिकेने जिंकला. त्यामुळे मालिका बरोबरीत आली. तिसरा सामना निर्णायक होणार, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र बांगलादेशने एकहाती सामना जिंकत मालिकाही जिंकली. तमीम इक्बालच्या नेतृत्वात बांगलादेशने पहिल्यांदाच आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा कारनामा केला.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : जेनेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल वेरेन, टेम्बा बावुमा (कॅप्टन), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि तबरेझ शम्सी.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : तमीम इक्बाल (कॅप्टन), लिटन दास, शाकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, यासिर अली, अफिफ हुसैन, मेहिदी हसन, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.