सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या जळगावमध्ये बुधवारी 16 मार्च रोजी सोन्याच्या दर 4 हजार 200 रुपयांची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दर किलोमागे 3 हजार रुपयांनी कमी झाले. नाशिकसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरातही सोन्याचे दर घसरले. नाशिकमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 51650 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर हे 47350 रुपये नोंदवले गेले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढले होते.
एकीकडे शेअर बाजार कोसळला होता. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यांनी आपला सारा मोर्चा सोन्याकडे वळवला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली होती. मात्र, आता रशिया आणि युक्रेन युद्धाची धग कमी होताना दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी होताना दिसून येतायत. लगीनसराईच्या तोंडावर हा नागरिकांना मोठा दिलासा आहे, असेच म्हणावे लागेल.
नाशिकमध्ये 7 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 49480 रुपये होते. या दरात घसरण होऊन आज बुधवारी हे दर 47350 वर स्थिरावले आहेत. तर 7 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 53950 रुपये होते. आज हे दर 51650 वर स्थिरावल्याचे जाणवले. 14 मार्चपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते आहे. नाशिकमध्ये 14 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 48200 रुपये होते. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52570 होते. त्यानंतर हे दर सातत्याने घसरत आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात सोन्याचे दर उतरताना दिसत आहेत. विशेषतः रशिया आणि युक्रेन युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार इतर क्षेत्राकडेही वळताना दिसत आहेत. त्याचा परिणाम सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात हे दर अजून घसरू शकतात. लगीनसराईत हा मोठा दिलासा आहे.