मध्य अमेरिकी देश अँटिग्वा येथून अचानक गायब झालेला भारतीय उद्योजक मेहुल चोक्सीला शेजारच्या डोमिनिकामध्ये अटक करण्यात आलीय. जिथून त्याला पुन्हा अँटिगा येथे आणण्याची तयारी सुरू आहे. त्याला डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलाय. तो अँटिग्वाचा नागरिक असल्यानं तिथे मिळणारे सर्व हक्क त्याच्याकडे आहेत. अँटिग्वा एक कॅरिबियन देश आहे. ज्या देशात मेहुल चोक्सीला अटक केली गेली, तो अँटिग्वाच्या आसपासच्या भागातच येतो. परंतु मेहुल चोक्सी डोमिनिकाला का गेला हे अद्याप अस्पष्ट आहे.
चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली होती. त्याशिवाय त्याचा गुन्हेगारी सहकारी नीरव मोदी याला युनायटेड किंगडम (UK) कोर्टाकडून मोठा धक्का बसला. कोर्टाने मोदीला कोणतीही सवलत देण्यापासून नकार दिला. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी आवश्यक पुरावे असल्याचंही वेस्टमिन्स्टर कोर्टानं स्पष्ट केले होते. नीरव मोदीनं पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचला होता.