आम्ही कष्टाळू! भारतातील कामगार करतात जास्त काम, नवीन अहवाल आला समोर

पाश्चात्य देशांच्या तुलनेत पूर्वेकडील देशांमधील लोक जास्त कामसू वृत्तीचे आहेत, असं तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र, ही बाब आता पुराव्यानिशी सिद्ध झाली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं (आयएलओ) नुकताच जगभरातील कामाचा वेळ आणि वर्क-लाईफ बॅलन्स याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालावरून, हे अगदी स्पष्ट होतं की दक्षिण-पूर्व देशांमधील कर्मचारी सर्वांत जास्त वेळ काम करतात. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळातील हा डेटा आहे.

आयएलओ अहवालानुसार, अमेरिका, ब्राझील आणि फ्रान्ससारख्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारत, चीन आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांमधील कामाचे सरासरी तास खूप जास्त आहेत. चीन आणि भारतामध्ये प्रतिकामगार वार्षिक कामकाजाच्या तासांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: 1970-2017 या काळामध्ये प्रतिवर्ष एक कामगार सुमारे 2 हजार तास काम करत होता. हे प्रमाण किंचित वाढलं असून एका कामगाराचे एका वर्षातील कामाचे तास दोन हजार तासांपेक्षा जास्त झाले आहेत. चीनमधील कामगार सर्वाधिक तास काम करतात तर भारतातील कामगार देखील याबाबत सातत्य राखून आहेत.

दुसरीकडे, दक्षिण कोरियामध्ये 1950 ते 1980 या काळात मानवी कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. काही काळासाठी या तासांमध्ये वर्षाला 2500 किंवा त्याहून अधिक तास अशी वाढ झाली होती पण लगेचच त्यात घट होऊन वर्षाला 2000 तास इतके झाले. या तासांची तुलना केल्यास ते भारत आणि चीनमधील कामाच्या तासांच्या मानाने कमी आहेत. या आकडेवारीवरून असं म्हणता येईल की, गेल्या 50 वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त काळाचा अभ्यासानुसार, दक्षिण आणि पूर्व आशियातील कामगारांचे वार्षिक कामाचे तास पाश्चात्य देशांपेक्षा जास्त आहेत.

आयएलओच्या अभ्यासात असं निदर्शनास आलं की, दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये एका आठवड्यातील कामाचे तास सर्वात जास्त आहेत. दक्षिण आशियामध्ये दर आठवड्याला एक कामगार सरासरी 49 तास कामं करतो तर पूर्व आशियामध्ये एक कामगार 48.8 तास काम करतो.

कामगारांतील महिला-पुरूष असा लिंग फरक लक्षात घेणंदेखील महत्त्वाचं आहे. दक्षिण आशियामध्ये, दर आठवड्याला पुरुष कामगार 51.5 तास काम करतात तर महिला कामगार 40.8 तास काम करतात. पूर्व आशियामध्ये पुरुषांसाठी कामाचे तास 49.4 तास आणि महिलांसाठी 48.1 आहेत. पूर्व आशियामध्ये उभय लिंगांसाठी सरासरी कामाच्या तासांमधील अंतर कमी आहे. यावरून असं दिसतं की, दक्षिण आशियाच्या तुलनेत पूर्व आशियामध्ये कामाच्या तासांमध्ये लैंगिक असमानता कमी आहे.

उत्तर अमेरिका, पश्चिम आणि दक्षिण युरोपमध्ये आठवड्यातील सरासरी कामाचे तास सर्वांत कमी आहेत. उत्तर अमेरिकेत एका आठवड्यात सरासरी 37.9 काम केलं जातं. पुरुष कामगार 40.1 आणि महिला कामगार 35.4 तास काम करतात. उत्तर, पश्चिम आणि दक्षिण युरोपमध्ये सरासरी 37.2 तास काम केलं जातं. पुरुष कामगार सरासरी 40.1 तास आणि महिला कामगार 33.8 तास काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.