राज्यात उन्हाच्या झळा बसतायेत. उकाड्यामुळे लोकं वैतागले आहेत. दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर पडताना हजारदा विचार करावा लागतोय. कडक उन्हामुळे सर्वच हैराण झाले आहेत.
विदर्भातील काही शहरात तर पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय. अशी परिस्थिती असताना विदर्भातील अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला आहे.
या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे नागरिक काही वेळ सुखावले. मात्र या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागला आहे. या पावसात शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचे काही प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.
दरम्यान, कर्नाटकच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. बंगळुरुमध्ये मुसळधार पाऊस पडला असून अनेक भागात पाणी साचलंय. याचा फटका वाहतुकीलाही बसला. या मुसळधार पावसामुळे वाहतूक 3 तास ठप्प झाली होती.