मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं, अक्कल लागते. धुडगुस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही अशा बोचऱ्या शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सत्ता गेली तरी बेहत्तर पण शरद पवार यांनी शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच चाक उलटं फिरु दिलं नाही. सत्तेसाठी शरद पवार कधीच हापापलेले नव्हते. चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. १० वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या योजना देता आल्या पाहिजे, शेततळी देता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका शरद पवार यांनी स्विकारली.
काही वेगळा प्रसंग घडला तर सर्वांना एकत्र आणायचा काम पवारांनी केलं, हा इतिहास नाकारु शकत नाही. बोलणाऱ्यांचं वय जेवढं आहे तेवढं शरद पवारांच्या राजकारणाचं आयुष्य आहे असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
लोकांच्या मनात विष कालावण्याचं काम करतायत. त्या व्यक्तीने कुठला काही साखर कारखाना उभा केला आहे, कुठली सूत गिरणी उभी केली, कोणती शिक्षण संस्था काढली, काय काम केलं ते सांगा, तुम्ही स्वत: काही केलं नाही आणि कोणती शिक्षण संस्था उभी करायला मदतही केली नाही. कधी शब्द खर्ची केला. काही व्हिजन दाखवलं, साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने असं अजित पवार यांनी म्हटलं.
दूध सोसायटी नाही, टरबूज-खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, मजूर सोसायटी नाही. मुळात यांना सोसायटी म्हणजे काय तेच कळत नसेल, नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला. माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं, अक्कल लागते. धुडगुस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना सुनावलं