तारीख ’01 जून’ काय योगायोग, या गावातील शंभर जणांचा वाढदिवस एकाच दिवशी होय! संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रक येथे एकाच दिवशी 100 नागरिकांचा वाढदिवस असल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे सामूहिकरित्या ‘बड्डे दिन’, साजरा केला गेला. एका रांगेत बसून 81 पुरुष आणि 19 महिलांचे औक्षण करुन केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्सव म्हणून येथे साजरा झाला. वैयक्तिक घरात चार- पाच जणांमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शंभर जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा केल्याने आनंद व्दिगुणित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात कोठे बुद्रक हे छोटेसे गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम बाराशे ते चौदाशे. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या या गावातून मुळा नदी वाहत असल्याने बऱ्यापैकी बागायत आणि सदन शेतकरी येथे राहतात. गावातील सामाजिक मंडळाने पुढाकार घेवून नवीन पंरपरा सुरू केली आहे. एक जून रोजी गावातील ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना एकत्र करुन सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा सोहळा सुरू केला आहे. 1 जून च्या संध्याकाळी नऊच्या सुमारास सर्व बर्थ-डे व्यक्तींना एकत्रित केले गेले. त्यांना महाराष्ट्रीयन फेटे बांधून माथ्यावर गंध, अक्षदा टाकत औक्षण केले आणि त्यानंतर एकचा वेळी शंभर केक कापत ” बार बार दिन ये आये..” हे हिंदी चित्रपटातील गाणे गात मोठा जल्लोष करण्यात आला.
81 पुरुष आणि 19 महिलां अशा शंभर जणांचे अभिष्टचिंतन यावेळी करण्यात आले. शंभर केक कापून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला गेला. प्रत्येकाने एक वृक्ष लावल्याने एकाच दिवशी शंभर नवीन वृक्ष कोठे बुद्रक गावात रोवली गेली. यावेळी बोलतांना बर्थडे बॉय उल्हास वाकळे सांगतात की, ‘ हा योग मैत्रीच्या नात्यातील असून आम्हाला माहीत नव्हेत की आमच्या गावात एकाच वेळी शंभर नागरिकांचा वाढदिवस आहे. आजच्या सोशल माध्यमांमुळे तसंच तरुण मंडळांनी पुढाकार घेतल्याने याचा उलगडा झाला. घरात केक कापत वाढदिवस साजरा होतो. मात्र आज आपल्याच शेजाऱ्यांसोबत केक कापल्याने याला उत्सवाचे स्वरुप आले असून एक जून हा वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जावा”.