जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या
राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण
२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल १ हजार किलो इतकं आहे! ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी हा ध्वज २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला.
न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही का?
न्यायाधीशांचा शेतकरी संघटनांना प्रश्न
तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी न्यायालयात आला आहात, तर सत्याग्रह कशासाठी करता? न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही (शेतकरी) संपूर्ण शहराला घेरल्यामुळे आधीच श्वास कोंडला आहे, आता तुम्हाला शहरांमध्ये येऊन कशासाठी आंदोलन करायचे आहे, तुम्हाला न्यायालयाविरोधात आंदोलन करायचे आहे का? अशी सरबत्ती करीत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शेतकरी आंदोलनावर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केल्याने शेतकरी संघटनांची ‘महापंचाईत’ झाली.
तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल
डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.
कोविड रुग्णांची संख्या
जगभरात कमी होतेय
कोविड रुग्णांची संख्या व मृतांची संख्या जगभरात कमी होत असून साप्ताहिक आकडे कमी होत चालले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आग्नेय आशियात दोन महिन्यांपासून रुग्ण व मृतांची संख्या कमी झाली आहे.
भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना
विलगीकरण सक्तीचे
भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागेल. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, ४ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.
मर्क कंपनीची करोनावरील
गोळी उपयोगी
मर्क कंपनीने करोनावरील उपचारासाठी एक गोळी तयार केली असून तिच्या प्रायोगिक चाचण्यांमध्ये रुग्णालयात दाखल होणे व मृत्यू होणे यात घट झाली आहे. ही घट निम्म्याने झाली असून आशादायी असे चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे. करोना उपचारासाठी या गोळीला अमेरिका व जगातील इतर देशांनी परवानगी द्यावी यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारची
कंगना ब्रँड अॕम्बेसिडर
अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॕम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लागलीच कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे.
नाशिकमध्ये देवीच्या
दर्शनासाठी टोकनची सक्ती
देशभरातील मोठमोठ्या मंदिर ट्रस्टच्या आर्थिक उलाढालींची अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, आता नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका देवी मंदिर प्रशासनानं अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना टोकन घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. मात्र, या टोकनसाठी १०० रुपये भरावे लागणार आहेत. ही व्यवस्था करण्यासाठी देण्यात आलेलं कारण देखील तेवढंच अजब आहे!
ताडोबा पहिल्याच दिवशी
पर्यटकांनी हाऊसफुल्ल
करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला लॉकडाऊन व त्यानंतर पावसाळा अशा मोठ्या विश्रांतीनंतर, जवळपास सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून व्याघ्र व वन पर्यटनासाठी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्याच दिवशी ताडोबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. यावेळी, ताडोबाच्या सहाही प्रवेशद्वारावरून ९२ जिप्सी, तीन कॅन्टरना प्रवेश देण्यात आला होता. याचवेळी ताडोबातील टी- १०० वाघाने दर्शन दिल्याने पर्यटकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण होतं.
जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत
भारत जॉर्जिया बरोबरीत
मेरी अॅन गोम्सने दिमाखदार कामगिरी कायम ठेवताना सालोमे मेलियाचा पराभव केल्यामुळे ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जॉर्जियाविरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव भारताला बरोबरीत सोडवण्यात यश आले. जॉर्जियाच्या लेला जावाक्शिव्हिलीने भक्ती कुलकर्णीला पराभूत केल्यामुळे भारतीय संघ पिछाडीवर पडला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामने जिंकणाऱ्या गोम्सने उपांत्य फेरीच्या पहिल्या डावातही दमदार खेळ केला. तिने मेलियाला ५५ चालींमध्ये शह देत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
SD social media
9850 60 3590