मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय मुंबईसाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहे. कारण पुढच्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण होते. रस्ते पाण्याखाली जातात, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने गुरुवार 14 जुलैच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्या शाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्या शाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी दिली आहे.
दरम्यान, आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढले आहे. मुंबईतील स्थानिक परिस्थिती पाहून सुट्टी देण्याबाबत सक्षम प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा. मुंबई विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. आपत्तीच्या पूर्व सूचनेवरून हवामान खात्याचा अंदाजारून तसेच त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक क्षेत्रातील शाळांना गुरुवारी सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून काढण्यात आला आहे. पण पालिकेकडून अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
पुण्यात शाळा बंदचा निर्णय
विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 14 आणि 15 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.