देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींचे एकेकाळचे जीवलग मित्र प्रवीण तोगडिया यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचं आर्थिक धोरण जॉबलेस असल्याची टिप्पणी करत मोदींजींची आर्थिक धोरणं काही कामाची नसल्याची टीका त्यांनी केली.
वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त करताना आर्थिक मॉडेलवर टीका केली.
खाजगीकरणावरुन तोगडिया यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच चिमटे काढले. देशात झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण माझ्या समजण्यापलीकडचं असल्याचं सांगत नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये, असं तोगडिया म्हणाले.
संस्थाचं खाजगीकरण म्हणजे देशाच्या जनतेला लुटणं
भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खाजगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असंच आहे, असं ते म्हणाले.
युरोपात सरकारी मालमत्तेचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथील परिस्थिती बिकट झाली आणि सरकारला सबसिडी दयावी लागली. भारताचं इकॉनॉमिकल मॉडेल बदलावे लागेल.. एक टक्का जीडीपी वाढल्यास एक कोटी रोजगार वाढला पाहिजे मात्र भारतात तसं होत नाही याला जॉबलेस ग्रोथ म्हणतात. जीडीपी वाढल्यास सरकारच उत्पन्न वाढतं, सध्या भारताचा इकॉनॉमिकेल मॉडेल हा जॉबलेस ग्रोथचा आहे, यात सरकारला कर मिळेल मात्र तुम्हाला रोजगार मिळणार नाही, असंही तोगडिया म्हणालेत.
नरेंद्र मोदी माझे मोठे भाऊ आहेत. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. नरेंद्र मोदी आता सोबत बसत नाही. माझ्यासोबत बसले तर त्यांना काही गोष्टी समजावून सांगू, असा चिमटाही तोगडिया यांनी काढला.
नरेंद्र मोदी हे माझे मोठे भाऊ आहे. माझ्या गावातून भाजी येत होती आणि ती माझ्या घरी येऊन नरेंद्र मोदी खात होते. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीय. पण त्यांचं वागणं बदललंय असं सांगत दोस्त दोस्त ना रहा, अशा प्रकारची सध्या अवस्था झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं.