ऐन दिवाळीमध्ये पवार काका-पुतण्यांसाठी साखर कडू लागायची चिन्ह आहेत. एकीकडे साखर कारखान्यांमुळे रोहित पवार अडचणीत आले आहेत. यानंतर आता अजित पवार यांना साखर आयुक्तांनी दणका दिला आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या हद्दीतील 10 गावं माळेगाव कारखान्याच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून नामंजूर करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे रोहित पवारही अडचणीत आले आहेत. राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे केली होती. मात्र, त्यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी क्लिन चीट दिली होती. आता सत्तांतर झाल्यानंतर राम शिंदे पुन्हा आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.या संदर्भात आमदार राम शिंदे यांनी आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साखर आयुक्तांसह बारामती अॕग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.