मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलने पहिला सिक्सर मारला आहे. एमसीए अध्यक्षपदी अमोल काळे यांचा विजय झाला आहे. एमसीए निवडणुकीत अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 150 मतं मिळाली. अमोल काळे हे मूळचे नागपूरचे असून देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात.
एमसीएच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे, पण या निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदान केलं नाही. तीनही ठाकरे हे एमसीएचे सदस्य आहेत, पण ते मतदानाला का आले नाहीत.
एमसीए निवडणुकीमध्ये पवार-शेलार पॅनल रिंगणात उतरलं आहे. या पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी आहेत. शरद पवार , आशिष शेलार यांच्या या पॅनलमध्ये जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे.
एमसीए निवडणुकीच्या आदल्या दिवशी पवार-शेलार पॅनलचे सगळे नेते एकत्र आले होते. शरद पवारांनी या पॅनलसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. या नेत्यांनी पवार-शेलार पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं.
आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार-शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याआधी संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही मोठा ड्रामा रंगला होता. संदीप पाटलांनी अर्ज दाखल करताना आपण पवार गटाकडून अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पवार आणि शेलारांची युती झाली. त्यावेळी शेलारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला. त्यानंतर संदीप पाटलांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं.