टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनिल गावसकर यांचे नाव क्रिकेट विश्वात आदरानं घेतलं जातं. गावसकर निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन तसंच सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड होता. निवृत्तीनंतर गेल्या तीन दशकांपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉमेंट्रेटर म्हणून प्रसिद्ध आहेत. नेहमी मोजून-मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावसकर यांनी राजस्थान रॉयल्सनं विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील मॅचच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला असून त्यांनी कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात दुसऱ्यांदा बॅटींग करणारी राजस्थानची टीम चांगल्या सुरूवातीनंतर संकटात सापडली. अखेर आर. अश्विननं केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थाननं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. राजस्थानच्या इनिंगच्या दरम्यान गावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा क्रिकेट फॅन्स करत आहेत.
राजस्थानच्या शिमरॉन हेटमायर 15 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला. त्यावेळी गावसकर मॅचची इंग्रजी कॉमेंट्री करत होते. त्यावेळी गावसकर यांनी, ‘हेटमायरच्या बायकोची नुकतीच डिलिव्हरी झाली. हेटमायर राजस्थानसाठी डिलिव्हरी करणार का? हा प्रश्न विचारला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.