‘मुंबईच्या विकासाला ब्रेक, महापालिकेत सत्ता आल्यास…’, मोदींनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यात वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या दौऱ्यातून पंतप्रधानांनी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. गरिबांचे पैसे घोटाळ्यामध्ये जात होते, पण मागच्या 8 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली. जगातली अर्थव्यवस्था अडचणीत असताना आपण 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.राज्यात महाविकासआघाडी सरकार असताना रखडलेल्या विकासकामांवरही पंतप्रधानांनी टोला हाणला. मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. 2014 पर्यंत मुंबईत 10-11 किमी मेट्रो होती. डबल इंजिन सरकार आल्यानंतर या कामांना वेग आला, पण नंतर काही वेळ काम स्लो झालं. शिंदे-फडणवीस येताच पुन्हा काम जलदगतीने सुरू झालं, असं विधान पंतप्रधानांनी केलं.
पुण्यात रंगणार महिला टेनिसचा संग्राम, 15 देशांच्या खेळाडू भिडणार!
सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात आता क्रीडा संस्कृती चांगलीच रूजली आहे. लवकरच शहरात आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. येत्या 21 ते 28 जानेवारी दरम्यान पुण्यात 40 हजार डॉलर रकमेची एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा होणार आहे. या वर्षी स्पर्धेची ही 22वी आवृत्ती असून भारतातील आघाडीच्या टेनिसपटू अंकिता रैना आणि करमन कौर थांडी यांच्यासह 15 देशांच्या खेळाडू खेळणार आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा आयोजित होणार आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील हार्ड टेनिस कोर्टवर 21 ते 28 जानेवारीदरम्यान स्पर्धेतील सर्व सामने खेळवले जातील.
सत्यजीत तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन, नाशिकसाठी महाविकासआघाडीची स्ट्रॅटेजी ठरली!
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन झालं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्रानी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये नाशिकची जागा मागून घेतली आणि सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांच्याकडे नसल्यामुळे ते अपक्ष रिंगणात उतरले.सत्यजीत तांबे यांच्याआधी काँग्रेसने सुधीर तांबे यांचंही निलंबन केलं होतं. नाशिकमध्ये उमेदवारच नसल्यामुळे पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत महाविकासआघाडीमध्ये खलबतं सुरू होती. यानंतर आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली.
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या पुत्राची निवडणूक रिंगणात उडी
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी उमेदवारी दाखल करून राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला आहे. आ. पाटील यांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८५ मध्ये कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊनच केली होती.
राज्याला मिळणार ६३ नवीन न्यायाधीश, प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत सुबोध भैसारे राज्यातून प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात शिक्षण घेतलेला सुबोध अशोक भैसारे (२६) याने राज्यात प्रथम क्रमांक, तर रेवती प्रशांत बागडे (२४) हिने मुलींमधून प्रथम, तर राज्यातून द्वितीय स्थान मिळवले आहे.सुबोध भैसारे याचे मूळगाव गोंदिया जिल्ह्यातील सौंदड आहे. मागील वर्षी त्याचे वडील जिल्हा न्यायाधीश पदावरून निवृत झाले. त्याचे वडील चंद्रपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत असताना सुबोधचे वास्तव्य चंद्रपुरात राहिले असून, जनता महाविद्यालय चंद्रपूर येथून तो १२ वी उत्तीर्ण झाला. वडिलांची अनेक ठिकाणी बदली झाली. त्यामुळे सुबोधला सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा अशा जिल्ह्यांतील अनेक भागांत राहण्याचा योग आला. कायद्याचे शिक्षण पुण्यातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयातून त्याने पूर्ण केले.
महिलांसाठी अनुकूल शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर… चेन्नईचा पहिला क्रमांक!
स्त्री शिक्षणासाठी आणि नोकरी-उद्योग व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागली. प्रवास करु लागली, तशा तिच्या गरजाही वाढल्या. या गरजांकडे अजूनही पुरेसे लक्ष दिलं जातं असं नाही. पण मोठ्या शहरांमध्ये किमान काही प्रमाणात का होईना विचार होऊ लागला आहे हे खरं आहे. अर्थात अजूनही महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता अशा अनेक सुधारणा होणं बाकी आहे, अशा निकषांचा विचार करूनच एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये चेन्नई शहर हे महिलांसाठी सर्वांत चांगलं सुरक्षित शहर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांवार आहे. त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे राजधानी दिल्ली यामध्ये १४ व्या क्रमांकावर आहे. देशातील राजधानीच्या फक्त १० शहरांनी पहिल्या २५ शहरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजी कन्सल्टींग फर्म ‘अवतार’ (Avtar)च्या वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे, यामध्ये एकूण १११ शहरांची यादी देण्यात आली आहे.
ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार?
कुस्तीपटूंच्या आरोपानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे २२ जानेवारीला आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. १८ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि अनेक कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि कुस्ती मंडळाचा निषेध केला. विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
SD Social Media
9850 60 3590