ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे. उत्तर-पश्चिम इंग्लंडमध्ये गाडी चालवत असताना सुनक यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी सीट बेल्ट काढला, याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी सुनक दोषी आढळले तर त्यांच्यावर 100 ब्रिटीश पाऊंडचा दंड होऊ शकतो.
ऋषी सुनक यांनी काही वेळासाठीच सीट बेल्ट काढला होता, त्यांच्याकडून चूक झाली आहे, असं डाऊनिंग स्ट्रीट (पंतप्रधान कार्यालय) च्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. ब्रिटनमध्ये कारचा सीट बेल्ट काढला तर 100 पाऊंडांपर्यंत दंड आकारला जातो. जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर हाच दंड 500 पाऊंड होते. वैद्यकीय कारणासाठी सीट बेल्ट लावला नसेल तर दंडामधून सूट दिली जाते.
पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक छोटा व्हिडिओ बनवण्यासाठी सीट बेल्ट काढला. हा एक निर्णय घेताना त्यांच्या हातून छोटी चूक झाली. सुनक यांनी आपली चूक स्वीकारून माफी मागितली आहे, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे, यासाठी सुनक आग्रही असल्याची प्रवक्ते म्हणाले.
ब्रिटनमध्ये 100 पेक्षा जास्त योजनांच्या घोषणांसाठी लेव्हलिंग अप फंडचा व्हिडिओ सुनक यांना बनवला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या कारच्या बाजूला बाईकवर काही पोलीसही दिसत आहेत.
ब्रिटनमध्ये विरोधी पक्षात असलेल्या लेबर पार्टीच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर टीका केली आहे. ‘ऋषी सुनक या देशात सीट बेल्ट लावणं, डेबिट कार्डचा वापर करणं, ट्रेन सेवा, अर्थव्यवस्थेचं प्रबंधन करणं जाणत नाहीत. प्रत्येक दिवशी ही यादी वाढतच चालली आहे. हे पाहणं दु:खद आहे,’ अशी टीका लेबर पक्षाने केली. ऋषी सुनक यांना कार्डवरून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करणं जमत नसल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.