हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू… पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा… आता तरी देवा मला पावशील का ?… आदी एकापेक्षा एक सरस गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं आज निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.
हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसायची. आज रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यावेळी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केलं जात होतं. जाधव यांनाही लिहिण्याची गोडी लागली आणि त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी उतरली. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांनी पहिलं गाणं लिहिलं होतं. मात्र, हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.
हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील का?, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी गाणी लिहीली आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.
एक शांत, संयमी, संवेदनशील थोर विचारवंत साहित्यिक, कवी, अख्या जगाला आपल्या लेखणीने प्रेरणा देणारे.. आंबेडकरी चळवळीला बळ देणारे लोककवी…. “पहा पहा मंजूळा..हा माझ्या भीमरायाचा मळा” हा विचार काव्यातन फुलविणारे.. “तूच सुखकरता तूच दुखहर्ता” हे गीत लिहून प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे… भावगीत, भक्ती गीतातून प्रबोधन करणारे कवी म्हणून हरेंद्र जाधव यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र लाडक्या कवीला मुकला आहे, अशी प्रतिक्रिया गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली आहे.