11 तासांच्या झाडाझडती, सीबीआयचे अधिकारी, देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर

11 तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले. ते काटोल येथील कोव्हिड सेंटरती पाहणी करण्यासाठी निघाले. मात्र, देशमुख यांच्या घरी पुन्हा सीबीआय पथक दाखल झाले. त्यामुळे त्यांना काटोल येथे न जाता अर्ध्या वाटेवरुन घरी परतावं लागलं. त्यानंतर सीबीआयच्या सहा जणांच्या पथकाने देशमुख यांची जवळपास अडीच तास चौकशी केली.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची याआधीही 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.