आज दि.१८ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शिवसेनेतल्या भुकंपानंतर शिंदे-ठाकरे पहिल्यांदाच आमने-सामने येणार, जोरदार खडाजंगी होणार!

जून महिन्यात विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. महाराष्ट्रातल्या या सत्तानाट्याच्या 6 महिन्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार 19 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतल्या बंडानंतर अधिवेशनात पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.

केंद्रीय मंत्री गडकरींना ट्रॅफीकचा फटका; नाशिकमधील कार्यक्रमस्थळी निम्म्याहून खुर्च्या रिकाम्याच..

टोल नाक्यावर सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसल्याच्या बातम्या आपण अनेकदा बघितल्या असतील. मात्र, आज नाशिकमध्ये टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच बसला. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत इगतपुरी मध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल होतं. मात्र, अनेक कार्यकर्ते या वाहतूक कोंडीत अडकल्याने कार्यक्रम स्थळी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने कार्यक्रमाचा चांगलाच फज्जा उडाला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याच चित्र पाहायला मिळालं. टोल प्रशासनाकडून टोल वसुलीसाठी वाहन थांबवली जात आहेत. मात्र, एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागूनदेखील टोल व्यवस्थापन या वाहतूक कोंडीवर पर्यायी व्यवस्था निर्माण न करू शकल्याने वाहनधारकांना या वाहतूक कोंडीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. नागरिकच नाही तर नितीन गडकरींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला.

कंट्रोल सुटलेल्या गाडीने तीन मुलांना चिरडलं

उत्तर दिल्लीच्या गुलाबी बाग भागात रविवारी शाळेजवळ भीषण अपघात झाला आहे. ताबा सुटलेल्या गाडीने फुटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना चिरडलं आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. प्रताप नगरचा रहिवासी असणारा 30 वर्षीय गजेंद्र लीलावती शाळेजवळ आपल्या ब्रिजा कारचं नियंत्रण गमावून बसला.

कारचा ड्रायव्हर जेव्हा लीलावती स्कूलजवळ पोहोचला तेव्हा त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडीने फुटपाथवर उभ्या असणाऱ्या तीन मुलांना टक्कर दिली, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी दिली.

बोगस मतदानाचा असाही प्रकार, मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात

आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला.बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

‘चित्रपटातून बेशरम गाणं हटवलं नाही तर…’, पठाणच्या वादात आठवलेंची उडी

अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ वादात सापडला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने भगव्या रंगाची बिकीनी परीधान केली असून, गाण्याचे बोल बेशरम रंग असे असल्यानं हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाला विरोध होत आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी या चित्रपटावरून इशारा दिला आहे. पठाण चित्रपटाला आमचा विरोध नाही. पण चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाचा पेहराव केला असून, गाण्याचे बोल बेशरम रंग असे आहेत. भगवा रंग हा भाजप, शिवसेनेचा तसंच तो गौतम बुद्धांच्या पेहरावातला हा रंग आहे. तो रंग शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे या चित्रपटातून हा भाग वगळला पाहिजे, असं न झाल्यास आम्हीपण आंदोलन छेडू, कोणताच रंग बेशरम नसतो, त्यामुळे तो रंग चित्रपटातून हटवायला हवा असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

“मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत आणणार”, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची मोठी घोषणा

सोमवारपासून नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी आगामी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडणार असल्याची माहिती दिली. तसेच या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळालादेखील आणणार असल्याचे सूतोवाच फडणवीसांनी केले.

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार मंगेश चव्हाणांची बिनविरोध निवड

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, अध्यक्षांच्या दालनातील एकनाथ खडसेंची लावलेली प्रतिमा तातडीने हटवण्यात आली.जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. महिनाभरापासून निवडणुकीमुळे जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले होते. निवडणुकीत भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणीत सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. यात भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली होती. त्यामुळे तेच अध्यक्षपदी विराजमान होतील, असे मानले जात होते.

फिफाचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना नकार?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात शांततेचा संदेश देण्यासाठी केलेली विनंती फिफाच्या आयोजकांनी फेटाळली आहे. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, कतार येथे खेळवल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात झेलेन्स्की व्हिडीओच्या माध्यमातून फुटबॉल चाहत्यांना शांततेचा संदेश देऊ इच्छित होते. पण फिफाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, यासंबंधी अद्यापही युक्रेन आणि फिफामध्ये चर्चा सुरु असल्याचंही वृत्त सीएनएनने दिलं आहे.

देशाच्या सीमा रक्षणाची जबाबदारी राज्यांचीही; पूर्व क्षेत्र बैठकीत गृहमंत्री शहा यांचे प्रतिपादन

भारताच्या सीमावर्ती भागांत सुरक्षेची जबाबदारी ही सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)प्रमाणेच संबंधित सीमेवरील राज्यांचीही आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे. ते शनिवारी पूर्व क्षेत्र परिषदेच्या बैठकीत बोलत होते.

पूर्व क्षेत्र परिषदेच्या २५व्या बैठकीत घुसखोरी, सीमांवरून होणारी तस्करी आणि भारत- बांगलादेश सीमेवरील धोके यावर प्रामुख्याने चर्चा झाली. गृहमंत्री शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. कोलकात्याजवळील पश्चिम बंगाल सचिवालयात ही बैठक झाली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि ओडिशाचे मंत्री प्रदीप अमप बैठकीला उपस्थित होते. आंतरराज्य वाहतूक आणि राज्यांतील पाणीवाटपावरही या वेळी चर्चा झाली.

पैसाच पैसा… फायनलमध्ये जिंकू किंवा हरु, दोन्ही संघांना मिळणार करोडो रुपये

फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच आज खेळला जात आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू होईल. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने असतील. लिओनेल मेस्सीकडे विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी आहे. कारण या अंतिम सामन्यानंतर तो कोणत्याही विश्वचषकात सहभागी होणार नाही. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा या महान सामन्याकडे लागल्या आहेत.फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ कडे लागले आहे. विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा संघ विजेतेपदासह करोडो रुपये घेऊन जाईल. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघ देखील मालामाल होईल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.