तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?,
शरद पवारांचा काँग्रेसला सवाल
काँग्रेसचे तीन महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. यावेळी शरद पवारांनी या नेत्यांना नेमका सवाल केला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचीही भंबेरी उडाली. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?, असा सवालच शरद पवारांनी केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांनी काँग्रेस नेत्यांना थेट सवाल केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आम्ही स्वबळावर जेवायला
येऊ : उद्धव ठाकरे
काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले आहेत. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा चिमटाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढला आहे.
अनिल देशमुख यांच्या पत्नी
आरती देशमुख यांना ईडीकडून समन्स
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे.
करोनाचा संसर्ग नसलेल्या
ठिकाणी शाळा सुरू केल्या जाणार
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे. यापुर्वी करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. दरम्यान, उद्यापासून करोनाचा संसर्ग नसलेल्या ठीकाणी शाळा सुरू केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई
भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय
मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
१५ हजार ५११ पदे भरणार
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची
राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच खाद्य आणि आपूर्ती मंत्रालयाची जबाबदारी देखील आहे. त्याचबरोबर टेक्स्टाइल मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे. १९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शरद पवार पंतप्रधानपदाचे
दावेदार : संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा चेहरा नसल्यास २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत विजयी होण्याची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. “विरोधकांचा मजबूत चेहरा नसेल तर २०२४ मध्ये मोदींचा पराभव करणे कठीण होईल. मोदींविरूद्ध लढण्यासाठी सध्या विरोधी पक्षात कोणीही नाही. सर्व विरोधी पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी एक चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा” असे संजय राऊत म्हणाले.
राज्यात जवळपास
70 टक्के पेरणी पूर्ण
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती दिली. अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीक पेरणी व पीक वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने केल्या
२० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने प्रशासनात मोठय़ाप्रमाणात फेरबदल करताना २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर, हिंगोली, अकोला, परभणी, जालना आदी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकत
पाकिस्तानला दिला क्लीन स्वीप
इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ३ गडी आणि १२ चेंडू राखून पराभूत केलं. इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकत पाकिस्तानला क्लीन स्वीप दिला. दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पाकिस्ताननं ५० षटकात ३३१ धावांचा डोंगर रचत इंग्लंडसमोर ३३२ धावांचं आव्हान दिलं होतं. विजय सहज शक्य आहे असं पाकिस्तानच्या फलंदाजीनंतर वाटत होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि सामना ३ गडी आणि १२ चेंडू राखून जिंकला. या सामन्यात जेम्स विन्सने ९५ चेंडूत १०२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
SD social media
9850 60 3590