मेसीची स्वप्नपूर्ती की फ्रान्सची पुनरावृत्ती? विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना आज

दोन्ही संघांना तिसऱ्या विश्वविजेतेपदाची संधी

फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीला विश्वचषकाचे जेतेपद खुणावत आहे. मात्र, जागतिक फुटबॉलमधील सर्वात मोठे यश संपादन करण्यासाठी रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेटिनाला गतविजेत्या फ्रान्सचे आव्हान परतवून लावावे लागेल. त्यामुळे मेसी आपल्या विश्वविजयाची स्वप्नपूर्ती करणार की फ्रान्सचा संघ विश्वविजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार, याकडे जगभरातील फुटबॉल रसिकांचे लक्ष असेल.

पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेसी. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंबाबत चर्चा करताना ही चार नावे प्रमुख्याने घेतली जातात. यापैकी ब्राझीलचे पेले आणि अर्जेटिनाचे मॅराडोना यांनी आपापल्या देशांना विश्वचषक जिंकवून दिला होता. पोर्तुगालच्या रोनाल्डोचे हे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, मेसीला पेले आणि मॅराडोना यांच्या कामगिरीचे अनुकरण करण्याची रविवारी संधी मिळणार आहे. मात्र, मेसीच्या मार्गात फुटबॉलचे भविष्य म्हणून पाहिले जाणाऱ्या किलियन एम्बापेचा अडथळा आहे. एम्बापेलाही ऐतिहासिक कामगिरीची संधी आहे.

२०१८ मध्ये पदार्पणातच विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम एम्बापेने केला होता. आता पुन्हा फ्रान्सला जेतेपद मिळवून देण्यास तो प्रयत्नशील आहे. २३ वर्षीय एम्बापेला पुन्हा विश्वचषक जिंकण्यात यश आल्यास तो पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल. आतापर्यंत केवळ पेले यांनाच आपल्या पहिल्या दोन विश्वचषकांमध्ये जेतेपद पटकावण्यात यश आले आहे.

अंतिम सामन्यात मेसी विरुद्ध एम्बापे या द्वंद्वाकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेसी आणि एम्बापे संयुक्तरित्या अग्रस्थानी आहेत. या दोघांनाही पाच-पाच गोल करण्यात यश आले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात गोल करून आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून देण्याचा आणि स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला मिळणारा ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावण्याचा दोन्ही तारांकित खेळाडूंचा प्रयत्न असेल.

फ्रान्सच्या संघाने गेल्या दशकभरात फुटबॉल विश्वावर वर्चस्व गाजवले आहे. दिदिएर डेशॉम्प यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने गतविश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता १९६२ नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरण्याचीही फ्रान्सला संधी आहे. डेशॉम्प हे खेळाडू म्हणून १९९८च्या विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा भाग होते. आता विश्वचषक जिंकणारे ते केवळ दुसरे प्रशिक्षक ठरू शकतील. यापूर्वी व्हिट्टोरिओ पोझ्झो यांनाच अशी कामगिरी करता आली आहे. त्यांनी १९३४ आणि १९३८मध्ये इटलीला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.

फ्रान्स आणि अर्जेटिना हे दोनही संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. फ्रान्सने १९९८ आणि २०१८मध्ये, तर अर्जेटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. मॅराडोना यांनी अविश्वसनीय कामगिरी करताना १९८६मध्ये अर्जेटिनाला विश्वचषक जिंकवून दिला होता. आता अर्जेटिनाला विजय मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी मेसीच्या खांद्यावर असेल. फ्रान्सविरुद्धचा सामना हा मेसीच्या विश्वचषक कारकीर्दीतील विक्रमी २६वा सामना असेल. मेसीने क्लब आणि जागतिक पातळीवर जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, विश्वचषकाच्या जेतेपदाने त्याला कायम हुलकावणी दिली आहे. आठ वर्षांपूर्वी जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेसी आणि अर्जेटिनाला पराभव पत्करावा लागला होता. आता मेसी आपल्या विश्वचषकातील कारकीर्दीची जेतेपदाने सांगता करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

फ्रान्सची दुखापतींवर मात

बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता आघाडीपटू करीम बेन्झिमा, तारांकित मध्यरक्षक एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा, बचावपटू प्रेसनेल किम्पेम्बे यांसारख्या फ्रान्सच्या नामांकित खेळाडूंना दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकावे लागले. मात्र, याचा फ्रान्सच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. बेन्झिमाच्या अनुपस्थितीत एम्बापेसह ऑलिव्हिएर जिरुड आणि अ‍ॅन्टोन ग्रीझमन यांनी फ्रान्सच्या आक्रमणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. युवा मध्यरक्षक ऑरेलियन टिचोआमेनीने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले. तसेच अ‍ॅड्रियन रॅबिओनेही  खेळ उंचावला. बचावात अनुभवी राफाएल वरान आणि थिओ हर्नाडेझ यांनी चमक दाखवली.

मेसीला अल्वारेझची साथ

यंदाच्या विश्वचषकातून आघाडीपटू ज्युलियन अल्वारेझच्या रूपात अर्जेटिनासाठी नवा तारा उदयास आला आहे. २२ वर्षीय अल्वारेझने मेसीला तोलामोलाची साथ देताना सहा सामन्यांत चार गोल नोंदवले आहेत. त्याने क्रोएशियाविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन गोल करत अर्जेटिनाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मेसीनेही अल्वारेझचे कौतुक केले. तसेच अर्जेटिनाच्या यशात गोलरक्षक एमिनियानो मार्टिनेझचे योगदानही निर्णायक ठरले आहे. त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेटिनाला विजय मिळवून दिला होता. त्याने दोन पेनल्टी अडवल्या होत्या. आता एम्बापेला रोखण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल.

आमनेसामने

* अर्जेटिना  विजय : ६

* फ्रान्स विजय : ३

* बरोबरी : ३

* वेळ : मध्यरात्री ८.३० वा.

* ठिकाण : लुसेल स्टेडियम

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा

संभाव्य संघ

अर्जेटिना : एमिलियानो मार्टिनेझ; नाहुएल मोलिना, निकोलस ओटामेन्डी, ख्रिस्टियन रोमेरो, मार्कोस अकुनया; रॉड्रिगो डी पॉल, लिआन्ड्रो पेरेडेस, एन्झो फर्नाडेस, अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर; लिओनेल मेसी, ज्युलियन अल्वारेझ

फ्रान्स : ह्यूगो लॉरिस; ज्युल्स कुंडे, राफेल वरान, इब्राहिमा कोनाटे, थिओ हर्नाडेझ; ऑरेलियन टिचोयुमेनी, अ‍ॅड्रियन रॅबिओ; ओस्मान डेम्बेले, अ‍ॅन्टोन ग्रीझमान, किलियन एम्बापे; ऑलिव्हिएर जिरूड.

* संघाची रचना : (४-३-३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.