अंबरनाथच्या सिलेंडर मॅनची कहाणी एकदा वाचायला हवी

अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचं मोठं कौतुक होतंय.

“30 किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण 45 किलोचं असून कसं चालेल?” हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचं. याच जिद्दीने सागरनं गेल्या 2-3 वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला.

सागर हा अंबरनाथच्या भारत गॅसची एजन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. 2 दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात, सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याचे व्यक्तिमत्व पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत त्याने ते फेसबुकवर टाकले. “एखाद्या वेबसीरीजमधलं पात्र शोभावं, असा हा सिलेंडर मॅन..”, असं कॅप्शन देत, अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि त्याचे हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसीरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्सपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या भारदस्त पर्सनॅलिटीचं कौतुक केलं आणि सागर रातोरात स्टार बनला.

सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे. 12वी पर्यंत शिकलेल्या सागरचं बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झालं. आई वडिलांचं छत्र हरपलेल्या सागरनं 12वी नंतर अंबरनाथला काका-काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो सध्या राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करतोय.

आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला 30 किलोचा सिलेंडर उचलायचा, तर आपण 45 किलोचं असून कसं चालेल? असा प्रश्न पडला आणि त्याने मागच्या 3 वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली. यानंतर आता त्याला पाहिलं, की जुना सागर नक्की हाच होता का?, असा प्रश्न पडतो. सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून, 4-4 मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन, पायऱ्या चढून, ते लोकांपर्यंत पोहचवून सागर त्याचं घर चालवतो. पण, आयुष्य एका रेषेत चाललं असताना अचानक असं काही तरी होईल, आणि आयुष्य रातोरात इतकं बदलेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं सागर नम्रपणे सांगतो.

सागर आता जिथे सिलेंडरची डिलिव्हरी द्यायला जाईल, तिथले लोकही उत्सुकतेनं आपल्याकडे पाहात असल्याचं सागर सांगतो. सागरच्या या स्टारडमचं त्याच्या सहकाऱ्यांनाही मोठं कौतुक आहे. सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.