कायम जनतेमध्ये असणारे नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता आता युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकद्वार त्यांनी ही माहिती दिली आहे.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे राज्यातील बडे नेते कोरोनाबाधित होत आहेत. सध्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यांचे कुटुंबीय अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, आता नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.