नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 12 डिसेंबर 2021 पासून ते 12 मार्च 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी 2 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखांना अशा मोहिमेचे आयोजन केले जाते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र आणि प्रमाणपत्र अतिशय सुलभरित्या उपलब्ध होते. ही मोहिम राबविण्याबाबत सर्व शासकीय समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा रूग्णालयामार्फत आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी कळवण, मालेगाव आणि नाशिक येथे नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी मुदतीच्या आत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळते. त्यासाठी वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरले जाते. दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही ओळखपत्र दिले जाते. त्यानंतर या ओळखपत्रांवर संबंधित आगारातील अधिकाऱ्याची सही शिक्का घेतल्यानंतर या ओळखपत्राच्या आधारे दिव्यांगांना प्रवासात सवलत दिली जाते. हे ओळखपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता केंद्र सरकारडून वैश्विक ओळखपत्र दिले जाते. या ओळपत्रावर आगार व्यवस्थापकांची सही व शिक्का घेण्याचीही आवश्यकता नाही. त्यामुळे दिव्यांगाचा त्रास कमी होणार आहे.