राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. ईडी आणि सीबीआयकडून छापेमारी करण्यात आल्यावर देशमुखांच्या मालमत्तांवर शुक्रवारी आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझडती करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी दाखल झालेल्या आयकर विभागाच्या टीम शनिवारी पहाटे झाडाझडती करुन निघाल्या.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाची टीम दाखल झाली आहे. नागपुरातील जीपीओ चौक येथील निवास स्थानावर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या काटोल निवास स्थानावर देखील इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथे देखील इन्कम टॅक्सने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते.
ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीयेत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.