विराट कोहलीनं टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेताच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच रवी शास्रींचा कार्यकाळ टी 20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे.
त्यानंतर बीसीसीआय पुन्हा एकदा हेड कोच पदासाठी अनिल कुंबळेला संपर्क करण्याच्या तयारीत आहे.
कुंबळे यापूर्वी 2016-17 या कालावधीमध्ये टीम इंडियाचा हेड कोच होता. मात्र विराट कोहलीशी झालेल्या मतभेदानंतर त्याने राजीनामा दिला होता. बीसीसीआयनं पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनीला मेंटर बनवलं आहे. त्यानंतर आठवभरातच विराट कोहलीनं टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी कुंबळेनं राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या माहितीनुसार कुंबळेला परत आणण्याची तयारी बीसीसीआयनं सुरू केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही कुंबळेनी पुन्हा कोच व्हावं अशी इच्छा आहे. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली होती. कुंबळे सध्या यूएईमध्ये असून पंजाब किंग्स या आयपीएल टीमचा हेड कोच आहे.
अनिल कुंबळेशी संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयनं श्रीलंकेचा माजी कॅप्टन महेला जयवर्धनेशी संपर्क केला होता. मात्र आपल्याला श्रीलंका टीम आणि आयपीएल फ्रँजायझीला कोचिंग देण्यात अधिक रस असल्याचं जयवर्धनेनं स्पष्ट केल्याचं वृत्त आहे. जयवर्धने सध्या मुंबई इंडियन्स टीमचा कोच आहे. कुंबळेनं रवी शास्त्रीचा उत्तराधिकारी होण्याची तयारी दर्शवली तर त्याला पंजाब किंग्सची जबाबदारी सोडावी लागेल. कारण, बीसीसीआयच्या घटनेनुसार टीम इंडियाचा हेड कोच अन्य कोणत्याही क्रिकेट टीमची जबाबदारी घेऊ शकत नाही.
का दिला होता राजीनामा?
अनिल कुंबळे 2016 साली सर्वप्रथम टीम इंडियाचा हेड कोच झाला होता. पण त्यावेळी कॅप्टन विराट कोहलीशी त्याचे मतभेद झाले. या मतभेदामुळेच कुंबळेनं वर्षभरानंतर पदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयनं कोहली आणि आपल्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता, असंही कुंबळेनं म्हंटलं होतं.