MIM सोबत राष्ट्रवादीची दिलजमाई! सोलापुरातील नव्या समीकरणाकडे नागरिकांचं लक्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आपण वारंवार वेगवेगळे राजकीय समीकरण पाहतोय. राज्यात अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार हे देखील एक नवं राजकीय समीकरण होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन वेगवेगळ्या विचारसरणी आणि भूमिकांचे पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात वेगळं राजकीय समीकरण बघायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली आणि भाजपची साथ धरली. त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांपुढे आणखी एक वेगळं समीकरण तयार झालं. राजकारणातील असंच काहीसं वेगळं समीकरणं आता राज्यपातळी पाठोपाठ स्थानिक पातळीवर देखील निर्माण होताना दिसत आहे. कारण सोलापुरात तशीच काहिशी घटना घडली आहे.

सोलापुरात एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची दिलजमाई झाल्याचं चित्र आहे. या दिलजमाईने एमआयएम पक्षाला मोठा झटका बसला आहे. कारण पक्षाच्या सात नगरसेवकांनी औवेसींची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेण्याचं ठरवलं आहे. राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात त्याचाच प्रत्यय येतोय. विशेष म्हणजे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:च्या पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये ते काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. कारण त्यांनी एमआयएम पक्षाला मोठं खिंडार पाडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.