राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ राज्यात विधान परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीपुढील आव्हान वाढलं आहे. भाजपच्या या आव्हानामुळे लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांसोबत बोलणं सुरु आहेत. तर दुसरीकडूनही भाजपची रणनीती सुरु आहे. या निवडणुकीची रणधुमाळी ताजी असताना 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठीदेखील निवडणूक होणार आहे. त्यासाठीदेखील भाजपने रणनीती आखली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप या निवडणुकीत आणखी सहावा उमेदवारही उभा करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं आणखी टेन्शन वाढण्याचे संकेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेसाठी भाजपचे दोन उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड या पाच नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. पण भाजप आणखी सहा उमेदवार देखील या निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार आहे. सहावा उमेदवार हा पश्चिम महाराष्ट्रातून असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
खालीलायक सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. आज हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा या निवडणुकीत फायदा होईल असा भाजपला विश्वास आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उभा केल्याने ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे आपले आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मंगळवारी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची मुंबईतल्या वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे आमदार राज्यसभा निवडणुकीपर्यंत हॉटेलमध्येच राहणार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी इतका मोठा खटाटोप सुरु असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत आणखी काय-काय पाहावं लागेल? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपने विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असेल तर ही निवडणूकदेखील पुन्हा प्रतिष्ठेची होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत आमदारांची संख्या पाहता भाजपचे चार आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत आरामात जिंकण्याची शक्यता आहे. भाजपने महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी पाचवा उमेदवारही उभा केला आहे. त्यापाठोपाठ भाजप सहावा देखील उमेदवार उभ्या करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.