आज दि.२३ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

निवडणुका गुजरातमध्ये पण सुट्टी महाराष्ट्रात, या 4 जिल्ह्यातल्या नागरिकांना स्पेशल सूट!

गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान  होणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

‘लव्ह जिहाद’चा संशय, विश्व हिंदू परिषदेकडून मुस्लिम तरुणांना कॉलेजमध्ये घुसून मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लव्ह जिहादशी संबंधी विषय असल्याचा संशय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना होता. याच संशयातून या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूरतच्या भगवान महावीर कॉलेजमधली ही धक्कादायक घटना आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.

भगवान महावीर कॉलेजमध्ये काही विद्यार्थी हिंदू मुलींशी संपर्क वाढवत होते, असा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आपण एक सर्व्हे केला, या सर्व्हेमध्ये मुस्लिम युवक हिंदू तरुणींसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, असं समोर आलं. आम्ही या तरुणांचा शोध सुरू केला, असा दावा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

तेजस्वींना भेटून आदित्य ठाकरे नितीश कुमारांकडे, तिसरी आघाडी होणार का?

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच युवासेनेचे नेते आदित्य उद्धव ठाकरे हे आज (दि. 23) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली. या दोन्ही युवा नेत्यांची भेट झाल्याने दोन राज्यांमध्येच नाही तर देशात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही भेटले आहेत.  यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. आदित्य यांच्यासोबत तेजस्वी यादवही होते.

तेजस्वी यादव यांची आणि माझी नेहमी चर्चा असते परंतु कोरोनामुळे आमची मागच्या काही काळात भेट झाली नाही. तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही माझी भेट झाली आहे. या दोघांमध्ये दोन्ही राज्यातील विकासाच्या मुद्दावर आमची चर्चा झाली. यामध्ये पर्यावरण, राज्यातील उद्योगधंदे तसेच देशातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी काय करता येईल याविषयावर आमची चर्चा झाल्याचे आदित्य म्हणाले. या देशात सध्या युवक बेरोजगार राहू नयेत तसेच महागाईवर काम करण्यसााठी आम्ही एकत्र आलो आहे.

‘जिंकण्यासाठी मैदानात उतरायचं, कामाला लागा’, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना नवे आदेश

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबादसह राज्यातील 24 महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबत नगरविकास खात्याने नवा आदेश काढला आहे. नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने राज्यातील पुन्हा नव्या राजकीय खेळ्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ज्याचं सरकार असत तो आपल्या सोयीस्कर प्रभाग पाडत असल्याचे त्यांनी या सरकारवर आरोपही केले आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ते म्हणाले की, सत्ता येतात जातात परंतु आपल्याला संघटना वाढीसाठी काम करावे लागणार आहे. सध्याचे सरकार हे आहे ते त्यांच्या सोयीनुसार प्रभागाची रचना करून घेण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. म्हणूनच त्यांनी पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचेही ते म्हणाले.

भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार करणार!

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.

भगतसिंह कोश्यारी वारंवार वादग्रस्त वक्तव्य का करतात?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नुकतच त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जाणून-बुजून वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांना कोपरापासून नमस्कार केलेला बरा. खरतर त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत. त्यांना हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचं आहे. त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

‘साहेब, घरचे माझं लग्न करत नाहीत’; अजब तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला तरुण

मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयात आले की, कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक त्यांचं लग्न करण्याची तयारी सुरू करतात. तुमच्यापैकी काहीजण तर लग्नाच्या गोष्टीला कंटाळलेलेदेखील असाल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये याच्या अगदी विरुद्ध अडचण असलेला एक तरुण आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्ती लग्न करू देत नाहीत, अशी या 30 वर्षीय तरुणाची तक्रार आहे. ‘साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या,’ असा विनंती अर्ज घेऊन एक तरुण ओराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? अजित पवारांचं मोठं विधान

राज्यातील सत्तांतरानंतर भाजपा आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहे. प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर असणे, त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात युती करण्याचे स्पष्टपणे संकेत दिले.

शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. पण, काँग्रेसबरोबर अनेकवेळा युतीबाबत चर्चा केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रगीत गाण्यास नकार देणाऱ्या इराणचा फुटबॉल संघ अडचणीत?

इराणमध्ये २२ वर्षीय महिला महसा अमिनीच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उमटले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी दोनही संघ मैदानावर राष्ट्रगीत गातात. मात्र, इराण सरकार विरोधातील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणचे सर्व खेळाडू राष्ट्रगीताला केवळ उभे राहिले. मात्र आता या कृतीसाठी इराणच्या संघातील सर्व खेळाडूंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोरोक्कोने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाला दिली कडवी झुंज, सामना ड्रॉ

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये मोरोक्कोने शेवटच्या उपविजेत्या क्रोएशियाला कडवी झुंज दिली. दोघांमध्ये ही चुरशीची लढत होती. फिफाच्या जागतिक क्रमवारीत क्रोएशियाचा संघ १२व्या क्रमांकावर आहे. तर मोरक्कन संघ २२व्या क्रमांकावर आहे. फिफा विश्वचषक २०२२ मधील क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांनी गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र एकाही संघाला यश मिळू शकले नाही. सामना अनिर्णित राहिल्याने क्रोएशियन संघाची चांगलीच निराशा होणार आहे. फिफा विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला फ्रान्सकडून ४-२ ने पराभव स्वीकारावा लागला.

सूर्यकुमार यादव धावांच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर, भारताचा माजी कर्णधार अव्वल स्थानी

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या दौऱ्यातही धावांचा पाऊस पाडण्याचा जलवा दाखवला आहे. सूर्यकुमारच्या आक्रमक फलंदाजीचा गजर संपूर्ण क्रिडा विश्वात वाजत आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकातही सूर्यकुमार यादवचा झंझावात पाहायला मिळाला होता. दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२२ मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.