आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २९ व्या सामन्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. या सामन्यात गुजरात टायटन्सने थरारक विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारली आहे. चेन्नईने केलेल्या १६९ धावांचे आव्हान स्वीकारुन गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकापर्यंत १७० धावा करत विजय मिळवला. या सामन्यात राशिद खान आणि डेव्हिड मिलर या जोडीने चौफेर फटकेबाजी केल्यामुळेच गुजरातला विजयापर्यंत पोहोचता आलं.
विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य गाठताना फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन संघाची सुरुवात अतिशय़ खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीला आलेला शुभमन गिल शून्यावर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात विजय शंकरदेखील शून्यावर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ गुजरातच्या १६ धावा असताना अभिनव मनोहर फक्त १२ धावा करुन तंबूत परतला. गुजरातच्या ४८ धावा झालेल्या असताना सलामीला आलेला वृद्धीमान साहा अवघ्या ११ धावा करु शकला. त्यानंतरराहुल तेवतीया आणि डेविड मिलर या जोडीने गुजरातला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल तेवतीयादेखील अवघ्या सहा धावा करुन झेलबाद झाल्यानंतर गुजरातची ४८ धावांवर पाच गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली.
५९ धावा होईपर्यंत गुजरातचा अर्धा संघ तंबुत परतला होता. त्यानंतर मात्र मैदानात पाय रोवून फलंदाजी करत असलेल्या डेविड मिलरने सामना फिरवला. त्याने चौकार आणि षटकार लगावत ढासळलेल्या गुजरातला मजबूत स्थितीत आणले. शेवटी ११ चेंडूंमध्ये १९ धावांची गरज असताना डेविड मिलर आणि राशिद खान या गोडीने कमालीची फलंदाजी केली.
राशिद खानने अठराव्या षटकात तीन षटकार आणि एक चौकार लगावत सामना फिरवला. सामना पुन्हा एकदा गुजरातच्या बाजूने झुकल्यानंतर मात्र राशीद खान चाळीस धावा करुन झेलबाद झाला. त्यानंतर अलझारी जोसेफची विकेट गेल्यानंतर सामना पुन्हा एकदा चेन्नईच्या बाजूने झुकला. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये गुजरातला १३ धावांची गरज होती. डेविड मिलरने चेन्नईच्या गोलंदाजांचा हिमतीने सामना करत सामन्यावर गुजरातचं नाव कोरलं. ख्रिस जॉर्डनने नो बॉल टाकल्यामुळे चेन्नईने सामना गमावला.