भारतातील करोनाबळी नक्की किती, जगामध्ये संभ्रम

करोनामृतांची जागतिक आकडेवारी जाहीर करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांमध्ये भारत अडथळे आणत असल्याच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताच्या अनुषंगाने भारताने करोनाबळींचा अंदाज लावण्याच्या संघटनेच्या पद्धतीवरच रविवारी प्रश्नचिन्ह निर्माण केले. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमुळे भारतातील करोनाबळी नक्की किती, याबाबत जगामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत विशाल असलेल्या देशात करोना मृत्यूच्या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी अशी गणितीय पद्धत लागू केली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताला उत्तर म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने एक निवेदन जारी केले. भारताने अनेक वेळा ‘डब्ल्यूएचओ’च्या पद्धतीबद्दल लेखी चिंता व्यक्त केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. भारत संबंधित विषयावर ‘डब्ल्यूएचओ’शी नियमित आणि सखोल तांत्रिक देवाणघेवाण करत आहे. डब्ल्यूएचओच्या सध्याच्या विश्लेषण पद्धतीत ‘विकसित’ गटातील देशांतून थेट प्राप्त झालेल्या मृत्यूच्या आकडय़ांचा वापर केला जातो, तर भारताचा समावेश असलेल्या ‘विकसनशील’ गटातील देशांसाठी ‘मॅथेमॅटिकल मॉडेिलग’ प्रक्रिया वापरण्यात येते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताचा मूळ आक्षेप विश्लेषणातील निष्कर्षांवर नाही, तर त्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीवर आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

‘विकसित’ गटातील देशांमधील आकडेवारीचा उपयोग आणि भारताच्या १८ राज्यांमधील न तपासलेल्या माहितीचा वापर करून डब्ल्यूएचओची ही पद्धत अतिरिक्त मृत्यूच्या अंदाजांचे दोन अतिशय भिन्न आकडे देते. अंदाजांमधील एवढय़ा मोठा फरकामुळे संबंधित पद्धतीच्या वैधतेबद्दल आणि अचूकतेबद्दल शंका उपस्थित होते, असेही भारताने म्हटले आहे. याबाबतचे भारताचे म्हणणे आतापर्यंतच्या सहा पत्रांद्वारे डब्यूएचओला कळवण्यात आले आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

भारत ‘डब्ल्यूएचओ’शी सहकार्यास नेहमीच तयार आहे. कारण यांसारखी माहिती धोरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते. त्यामुळे कार्यपद्धतीबद्दल सखोल स्पष्टता आणि त्याच्या वैधतेचा स्पष्ट पुरावा महत्त्वाचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.