मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या मुस्लिम संघटनेने इशारा दिला होता.
देशातील मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचं आहे, असं पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी म्हणाला होता. तसंच यावेळी त्याने ‘छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं’, असा नारा दिला. जर तुम्ही महाराष्ट्रातील एकाही लाऊडस्पीकरला हात लावलात तर तुमचा विरोध करण्यासाठी PFI सर्वात पुढे दिसेल, असा इशारा त्याने दिला होता.
वादग्रस्त विधानानंतर मतीन शेखानी हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी शोध मोहीम राबवली आहे. मुंब्रा पोलिसांनी मतीनच्या मुंब्रा परिसरातील घरात आणि कार्यालयात तपास केला, मुंब्रा पोलिसांची दोन पथके मतीनचा शोध घेत आहेत.
मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतीनला लवकरच अटक करण्यात येईल. विनापरवाना गर्दी जमवल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. मात्र अटकेनंतर मतीनवर दाखल गुन्ह्यात कलमे वाढू शकतात.
भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.