देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो असलेल्या इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT कानपूरला 100 कोटी दिले आहेत. संस्थेला माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही सर्वाधिक मोठी देणगी आहे. ही रक्कम संस्थेमध्ये बांधण्यात येत असलेल्या SMRT म्हणजेच स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या बांधकामासाठी मदत म्हणून देण्यात आली आहे. ही शाळा आयआयटी-कानपूरच्या कॅम्पसमध्ये सुरू केली जाणार आहे. मात्र, इतकी मोठी देणगी दिल्याने चहुकडे चर्चेला उधान आलंय. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी गंगवाल हे शाळेच्या सल्लागार मंडळावरही आहेत.
अशा उदात्त प्रयत्नात संस्थेशी जोडले जाणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. विविध क्षेत्रात हजारो प्रतिभावान माणसे घडवणारी ही संस्था आता आरोग्यसेवा क्षेत्रात मार्गक्रमण करत आहे. ही शाळा दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 लाख 10 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेले 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शैक्षणिक ब्लॉक, निवास उभारले जाणार आहे.
इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘पैसे मिळताच हा प्रकल्प पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. SMRT अंतर्गत, संस्थेत 500 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देखील उघडण्यात येणार आहे. आता अभियांत्रिकीसोबतच वैद्यकीय शिक्षणही आयआयटीमध्ये होणार आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या गरजेनुसार संशोधन उपकरणेही विकसित केली जातील. यासोबतच गंभीर आजारांवरही या संस्थेत उपचार केले जाणार आहेत.’
गंगवाल यांनी 1975 मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. प्राध्यापक करंदीकर यांनी मुंबईत गंगवाल यांची भेट घेतली होती. यानंतर गंगवाल यांनी त्यासाठी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात कार्डिओलॉजी, युरोलॉजी, कार्डिओथोरॅसिक, नेफ्रोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी आणि ऑन्कोलॉजी यासह अनेक पीजी कोर्सेस असतील. न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक, यकृत, किडनी आणि कर्करोगाच्या उपचारांसाठीही अभियांत्रिकीच्या मदतीने उपकरणे विकसित केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला जाणार आहे.