आशिया चषकातल्या दुसऱ्या सुपर फोर लढतीत टीम इंडियाला पुन्हा एकदा पराभव स्विकारावा लागला. श्रीलंकेनं रोहित शर्माच्या भारतीय संघाला या सामन्यात 6 विकेट्सनी हरवून सलग तीन सामन्यात जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारतानं दिलेलं 174 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं अखेरच्या षटकात पार केलं. या विजयासह श्रीलंकेनं अंतिम फेरीतलं आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे.
मेंडिस-निसंकाची भागीदारी निर्णायक
भारतानं दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या पथुन निसंका आणि कुशल मेंडिसनं 97 धावांची सलामी दिली. त्यांनी सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना 57 धावा कुटल्या. या दोघांनी आपापली अर्धशतकही साजरी केली. निसंकानं 52 तर मेंडिसनं 57 धावा फटकावल्या. या दोघांनी श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर भानुका राजपक्षे (25) आणि कर्णधार शनाकाच्या (33) 64 धावांच्या अभेद्य भागीदारीनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताकडून युजवेंद्र चहलनं 3 विकेट घेऊन सामन्यात चुरस निर्माण केली होती. पण राजपक्षे आणि शनाकाच्या भागीदारीमुळे श्रीलंका सरस ठरली.
टीम इंडियाचं काय होणार?
सुपर फोर फेरीतले अव्वल दोन संघ रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये खेळणार आहेत. पण श्रीलंकेनं दोन सामने जिंकून आपलं फायनलमधलं स्थान जवळपास पक्क केलं आहे. दुसरीकडे बुधवारच्या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केल्यास पाकिस्तान फायनल गाठेल. त्यामुळे भारतासाठी फायनल गाठणं आता जवळपास अशक्य आहे.