उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असलेल्या जळगावतील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सातत्यांनं सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली होती. त्यांच्यातील वाद थांबल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताहेत. त्यामुळं ऐन थंडीच्या काळात जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलंय. गिरणा परिक्रमेच्या सुरुवातीलाच उन्मेष पाटलांनी एका पत्रकार परिषदे वाळू चोरीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटलांना लक्ष्य केलं होतं. कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू चोरीला पालकमंत्र्यांचं एकप्रकारे अभय असल्याचा हा अप्रत्यक्षपणे पालकमंत्र्यांना टोला होता.
पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना 12 महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. तर, कोरोना लसीकरण झालेलं आहे त्यामुळं आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार आहे, असं उन्मेष पाटील म्हणाले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाळू चोरीच्या मुद्यावर लोकांच्यामधून आवाज उठवणार आहे. पालकमत्र्यांनी ठरवलं तर त्यांच्यासाठी ही छोटी बाब आहे, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं.
वाळू उपशाचा प्रश्न आताचं निर्माण झालेला नाही. वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावं, असं प्रतिआव्हान गुलाबराव पाटील यांनी दिली. वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते. पण, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागतं, असं पालकमत्री गुलाबराव पाटील म्हणाले. उन्मेष पाटलांनी केलेल्या टीकेला आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करताय. मागेच मी सांगितलंय की त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांचा समाचार घेतलाय.