जनता सोनिया गांधींच्या पाठीशी उभी – थोरात
देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधींच्या पाठीशी आहेत, असं मत विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. नॕशनल हेराॕल्ड प्रकरणी ईडीने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले असून सोनिया यांना ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
दादा पर्व संपलं, सौरभ गांगुलीने दिला BCCI चा राजीनामा
आयपीएलच्या हंगामाची सांगता झाल्यानंतर आता सौरभ गांगुलीने मोठा निर्णय घेतला आहे. सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करून सौरभ गांगुलीने राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. सौरभ गांगुलीने राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षपदी कुणीची निवड होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
सौरभ गांगुलीने ट्वीट करून आपण बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
“मी एक सीडी लावली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”; करुणा शर्मा
करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंडेच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. एवढंच नाही तर, मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असे खबळजनक वक्तव्यही शर्मा यांनी केले आहे.
सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे उद्या सीबीआयकडून १०० कोटी खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावं असा अर्ज त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला होता. संबंधित अर्जाला आता न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. संबंधित गुन्ह्यात सचिन वाझे हे सहआरोपी आहेत.
एकनाथ खडसेंना ईडीचा मोठा दणका, जप्त प्रॉपर्टी खाली करण्याचे आदेश
काँग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याची बातमी ताजी असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे.
मान्सून तोंडावर आला तरी देशात साखर कारखाने सुरूच
देशात यंदाचा साखर हंगाम अद्यापही सुरू आहे. मान्सून तोंडावर आला तरी देशातील अनेक साखर कारखाने अजूनही सुरूच आहेत. देशात 523 साखर कारखाने आहेत यापैकी सुमारे 450 च्यावर कारखाने बंद झाले असले तरी काही कारखान्यांचा ऊस लाखो हेक्टर शिल्लक आहे. महाराष्ट्रात अद्यापही 15 लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप शिल्लक राहिल्याचा अंदाज आहे. दरम्यान देशात 523 पैकी 52 साखर कारखाने सुरू आहेत. यातील 38 साखर कारखाने महाराष्ट्रातील आहेत.
यशची नवरीबाई नटली मेंदी समारंभासाठी! समोर आला नेहाचा पहिला लुक
‘माझी तुझी रेशीमगाठ ‘ मालिका सध्या एक वेगळ्या वळणावर आहे. आजोबांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच यशच्या घऱी सनई चौघडे वाजणार आहेत. होय तिकडं लग्नापूर्वीच्या काही कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली आहे. नेहाचा मेंदी लुक देखील समोर आला आहे.
यश आणि नेहा सर्वांची आवडती जोडी आहे. नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तर यशची भूमिका श्रेयस तळपदे साकारताना दिसतो. छोड्या पडद्यावरील लोकप्रिय अशी ही जोडी लवकरच मालिकेत रेशीमगाठ बांधणार आहे. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना देखील सुरूवात झाली आहे. नेहाला यशच्या नावाची मेंदी लागणार आहे. यासाठी नवराई नेहा छान नटली देखील आहे. तिचा मेंदी लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणजे पोलादी इच्छाशक्तीचे नेते – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी येऊन आता 8 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा लेखाजोखा केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मोदी यांच्याविषयी विशेष लेख लिहला आहे. ते म्हणाले, की आशा आणि बदल या दोन गोष्टींचं आश्वासन देऊन नरेंद्र मोदीजी 2014 मध्ये पंतप्रधानपदी निवडून आले. गेल्या आठ वर्षांत त्यांनी या गोष्टी दिल्या आहेत. त्यांनी नव्या भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्यांचे विचार, कृती आणि दृष्टिकोन यांच्या साह्याने त्यांनी विकास आणि प्रगतीच्या पथावर आपल्या देशाचं यशस्वीरीत्या सारथ्य केलेलं आहे.
त्यांच्या जबरदस्त कार्यामुळे भारताला जागतिक राजकारणात प्रभावी स्थान प्राप्त झालं आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे भारताने सत्यात उतरवलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि क्रिएटिव्हिटी यांमध्ये याचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे भारताने अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतही अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर प्रगतीसाठी ते प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन करतात. त्यामुळे नवभारताच्या उभारणीमध्ये 135 कोटी भारतीयांच्या भावना आणि इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब दिसतं.
दरड कोसळणाऱ्या धोकादायक गावांना ठाकरे सरकार देणार सुरक्षित निवारा
मागच्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरण लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 2019 आणि 2021 या वर्षांत झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळून शेकडो जणांचा मृत्यू झाला होता.
पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट, मनसेला मोठा झटका बसणार?
मनसे नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील इतर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील सुरु असलेले अंतर्गत वाद हे याआधी अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, अशा विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी एक बातमी आता समोर आली आहे. पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली आहे.
संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. याशिवाय राऊतांनी मोरे यांना तात्या म्हणून हाक मारली.
नेवपूर वाकीत पहिल्यांदाच महिलांच्या हस्ते शनिदेवांचा अभिषेक
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे साजरी केली जाते. या दिवशी शनी देवांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे शनी जयंती आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे शनीदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. त्यामुळे सोमवती अमावस्येला नेवपूर वाकी येथील श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान येथे शनिजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेवपूर-वाकी येथे पहिल्यांदाच एक घटना घडली आहे.यावर्षी पहिल्यांदाच शनिदेवांच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला. इतकेच नव्हे तर श्री श्री 1008 महामंडलेश्वर सुखदेव महाराज यांनी महिलांच्या हस्ते शनिदेवांचा अभिषेकही करुन घेतला. देवस्थानचे सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम झाला.
भारताच्या लसीकरण मोहिमेन जगाचे अंदाज खोटे ठरवले, 97 टक्के नागरिकांपर्यंत लस, मोदींचं कौतुक
भारतातील 140 कोटी नागरिकांचं कोविडसाठीचं लसीकरण होण्यासाठी जवळपास एक दशकाचा अवधी लागेल, असं काही दिवसांपूर्वी एका आतंरराष्ट्रीय माध्यमानं म्हटलं होतं. मात्र, देशातील लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर एक वर्ष चार महिन्यांच्या कालावधीतच आपण संपूर्ण लसीकरणाच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत. 15 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 97 टक्के नागरिकांनी पहिली लस घेतली आहे, तर 86 टक्के नागरिकांचा दुसरा डोसही झालेला आहे. मोदी सरकारला 8 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी देशातील कोविड लसीकरण मोहीमेचं कौतुक केलं आहे.
भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेनं केवळ हाच नाही, तर अनेक अंदाज खोटे ठरवले आहेत. पूर्वलक्षी आणि कोविडच्या व्यवस्थापनात यशस्वी ठरलेल्या या मोहिमेनं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासंबंधी व इतरही अनेक समजुती खोट्या ठरवल्या.
SD Social Media
9850 60 3590